कांदा अनुदानावर शेतकरी नाखूश

कांदा अनुदानावर शेतकरी नाखूश

नाशिक । मोहन कानकाटे Nashik

बाजारात कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकर्‍यांनी कांदा रस्त्यावर फेकून देत सरकारचा निषेध करत कांद्याला भाव वाढवून देण्याची मागणी केली.त्यातच सध्या सुरु असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कांद्याचा मुद्दा प्रचंड गाजला.

या अधिवेशनात कांदा प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत कांद्याला भाव वाढवून देण्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देत प्रति क्विंटलला 300 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु, त्यावरूनही विरोधक आणि कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारने 300 रुपये सानुग्रह अनुदान देऊन क्रूर चेष्टा केल्याचे म्हटले.

त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत 300 रुपयांच्या ऐवजी 350 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र यावरून देखील शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्ती केली असून कांद्याला प्रति क्विंटलला एक हजार ते 1500 रुपये खर्च येत असल्याने कांदा अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यावर कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

कांद्याचे रोप लावणीपासून ते विक्रीपर्यंत कांदा उत्पादक शेतकर्‍याला 60 ते 65 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे कांद्याला 25 ते 30 रुपये भाव देऊन 15 रुपये किलो दराने सानुग्रह अनुदान दिले पाहिजे. मात्र, सरकारने कांद्याला 350 रुपये सानुग्रह अनुदान देऊन कांदा उत्पादक शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा केली आहे.

भगवान जाधव मकरंदवाडी, ता. देवळा, कांदा उत्पादक शेतकरी

सरकारने कांद्याला 350 रुपये दराने दिलेले सानुग्रह अनुदान हे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मान्य नाही. कांद्याची शेती हा शेतकर्‍यांचा एक व्यवसाय असून सरकार हा व्यवसाय मान्य करायला तयार नाही. त्यामुळे सरकारने कांद्याचा व्यवसाय गृहीत धरून कांद्याला हमीभाव द्यावा.

माणिक मोरे मोरेनगर, ता.सटाणा, कांदा उत्पादक शेतकरी

सरकारने कांद्याला 350 रुपये सानुग्रह अनुदान देऊन कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कांद्याचा किलोमागे उत्पादन खर्च 12 रुपये असून त्यातून सहा ते सात रुपये खर्च होतो. तर उरलेले पैसे शेतकर्‍याला मिळतात. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली असून सरकारने सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवायला हवी.

यशवंत गावंडे ,गावंधपाडा, ता. पेठ, कांदा उत्पादक शेतकरी

सध्या अवकाळीचा कहर सुरू असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा रस्त्यावर फेकून देत सरकारचा निषेध करत आहे. त्यातच सरकारने कांद्याला 350 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची केलेली घोषणा म्हणजे निव्वळ सरकारी गारपीटच आहे.

किरण मोरे ,मोरेनगर, ता.सटाणा, कांदा उत्पादक शेतकरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com