कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित नको

पालकमंत्र्यांच्या प्रशासनास सूचना
कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित नको

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून कांदा अनुदान शेतकर्‍यांना मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख 72 हजार 152 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 435 कोटी 61 लाख 23 हजार 578 रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या अपलोड करण्याचे काम बुधवारी उशिरापर्यंत सुरू होते. हे कामकाज विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचार्‍यांनी केले आहे.

कांदा उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहत असेल किंवा काही टेक्निकल अडचणी येत असल्यास शेतकर्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचे आवाहन नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. शेतकरी मदतीपासून वंचित राहिला नको, याबाबत सबंधित यंत्रणेला देखील सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा अनुदानापासून वंचित राहणार नाही. शेतकर्‍यांना दोन टप्प्यात हे अनुदान देण्यात येणार असून दुसरा हप्ता देखील लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल. योग्य खाते क्रमांक नसल्यास संबंधित शेतकर्‍यांशी संपर्क करून योग्य खाते क्रमांक घेण्याच्या सूचना देखील अधिकार्‍यांना केल्या आहेत.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकर्‍यांना मदत जाहीर केली त्यानुसार ती मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा नाफेडकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने 27 मार्च 2023 ला घेतला. क्विंटलला 350 रुपयेप्रमाणे 200 क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले.

सरकारने घोषणा केल्यानुसार 3 ते 30 एप्रिलला शेतकर्‍यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तावाची तपासणी सरकारी लेखापरीक्षक यांच्यातर्फे करण्यात आली. त्यानंतर आता शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com