
मुंबई | Mumbai
आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी विधानसभेवर नाशिक ते मुंबई पायी लॉन्ग मार्च काढला होता. यानंतर हा लॉन्ग मार्च मुंबईच्या वेशीवर पोहचला असून लॉंग मार्च दरम्यान एका आंदोलक शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू (Farmers Death) झाला आहे.
त्यानंतर या शेतकरी आंदोलनाचे नेते व माजी आमदार जे. पी. गावित (G.P Gavit) आणि माकप आमदार विनोद निकोले (MLA Vinod Nikole) यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपुढे मांडल्या. यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आंदोलनाचे नेते व माजी आमदार जे. पी. गावित यांनी आम्ही आमचा लॉन्ग मार्च स्थगित करत आहोत, असे सांगितले.
यावेळी गावित म्हणाले की, आमच्या लॉन्ग मार्चला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आणि मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा मार्च संपणार नाही अशी आमची भूमिका होती. त्याप्रमाणे आमची सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत जवळजवळ ७० टक्के मागण्या राज्य सरकारने आमच्या समोर मान्य केल्या.तर उर्वरित मागण्या काही दिवसांमध्ये पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे, असे जे. पी. गावितांनी म्हटले.
दरम्यान, आज जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) आंदोलनस्थळी दाखल होत सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची प्रत शेतकऱ्यांना भेट दिली. त्यानंतर शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या लॉन्ग मार्चमध्ये पुरुष शेतकऱ्यांप्रमाणे महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.