जिल्ह्यावर आभाळमाया

जिल्ह्यावर आभाळमाया

संततधारेने पिकांना संजीवनी, बंधार्‍यातील जलसाठ्यात भर

नाशिक | टीम देशदूत | Nashik

सुमारे 40-45 दिवसांच्या उसंतीनंतर पावसाने (Rain) जिल्ह्यात (Nashik District) गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर हजेरी लावली आहे. संततधार पावसाने गावोगावचे साखळी बंधारे, गावठाण तळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बंधार्‍यामध्ये पाण्याची भर पडत आहे. खरीप पिकांना (Kharif crops) संजीवनी मिळाली आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे....

जिल्ह्यात मध्यंतरी पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाची पेरणी उशीरा झाली. जमिनीतील ओल घटल्याने सुरुवातीला पेरणी वा लागवड झालेल्या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता. पावसासाठी शेतकर्‍यांसह सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. हवामान विभागाने अलीकडेच वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारपासून पावसाने जिल्ह्यात संततधार लावली आहे.

इगतपुरीत जनजीवन प्रभावित

तालुक्यात (Igatpuri Taluka) पावसाचा जोर अधिक असल्याने महामार्गासह इतर ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाट लागली आहे. तालुक्याच्या पश्चिम घाट (Western Ghats) पट्टयासह शहरात, कसारा घाट (Kasara Ghat) परिसरात संततधार आहे.

त्यामुळे इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 36 तासांपासून पावसाबरोबर धुकेही दाट असल्याने महामार्गावर वाहतूक मंदावली होती.

भावली, मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, घोटी, देवळे, टाकेघोटी, कावनई, कारावाडी, आवळखेड, काराचीवाडी चिंचलेखैरे तसेच पुर्व भागातील गोदें, पाडळी देशमुख, अस्वली मुकणे, जानोरी नांदगाव, वाडीवर्हे, सांजेगाव, म्हसुर्ली, आहुर्ली, वैतरणा, टाकेद, साकुर, शेणीत माणिकखांब, देवळे, खैरगाव, आंबेवाडी इंदोरे, वासाळी, खेड, बेलगाव तर्हाळे, धामणगाव, तळेगाव ,बलायदुरी, पारदेवी त्रिंगलवाडी आदी भागात दमदार पाऊस होता.

निफाडला 135 गावे चिंब

तालुक्यात (Niphad Taluka) दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. भाजीपाला पिकासह, खरीप आणि टोमॅटोला पावसाने दिलासा दिला. तालुक्यातील सर्व 135 गावे संततधारेने चिंब झालेली होती. त्यामुळे शेतशिवार आणि नाल्यांना पाण्याचा विळखा पडलेला होता. शेतकर्‍यांना पावसाने दिलासा दिला आहे.

नाशिकमध्येही रिपरिप

धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक तालुक्यातील उत्तर भागात पावसाची रिपरिप दोन दिवसांपासून कायम होती. शेतीसह जलसाठ्यांना हा पाऊस उपयुक्त ठरल्याची चर्चा सुरू आहे.

पेठ, सुरगाणा, दिंडोरीत जोरधार

आदिवासी तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात पावसाचा वेग दोन दिवसांपासून अधिक होता. त्यामुळे या भागातील करंजवण, चणकापूर, ओझरखेड धरणांमध्ये पाण्याची भर पडत होती. त्याचबरोबर नागली, भात पिकांना जोरदार पावसाचा लाभ झाला. ग्रामीण मार्गावर संततधारेने खड्यांचे प्रमाण वाढल्याने किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या.

सिन्नरला दमदार

सिन्नरला पूर्व भागातील वावी, पांगरी, शहा, पंचाळे, वडांगळी, देवपूर आदी परिसरात संततधार सुरू आहे. तसेच नांदूरशिंगोटे, दोडी, दापूर, चास परिसरातही पावसाची चांगली सुरुवात झाली आहे. पश्चिम भागातील ठाणगाव, डुबरे, सोनांबे, पांढुर्ली, विंचूर-दळवी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना तर जीवदान मिळाले आहे.

तूर, मूग, बाजरीला जीवदान

नांदगाव तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर सलग पाऊस गत दोन दिवसांपासून होत आहे. या तालुक्यात तूर, मूग, बाजारी, मका, कापूस या पिकांसह सोयबीन, भाजीपाला पिकांना पाण्याची असलेली गरज पावसाने पूर्ण केली आहे. त्याचबरोबर परिसरातील लहान-मोठे तळ्यांमध्ये पाण्याची भर पडत होती.

येवल्यात पिकांना फायदा

येवल्या तालुक्यात खरिपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. संसतधार भिजपाऊस असल्याने जमीनीत पाणी मुरून पिकांना लाभ होणार असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये होती.

दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमजून गेलेली होती. सोयाबीन, कापसाचे क्षेत्र येवल्यात अधिक असल्याने या भागात पावसाची गरज होती, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी दिली. मुखेड परिसरातील नदी-नाल्यात पाणी वाहू लागल्याने शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे.

त्र्यंबकेश्वरला जोरदार हजेरी

तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दर्‍या-खोर्‍यातील नदी-नाले ओसांडून वाहत होती. तसेच नुकतीच लागवड झालेली भात, वरई, खुरसणी आणि नागली पिकांना जोरदार पावसाने हातभार लागला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सरासरी 60 टक्के पाऊस

गेल्या आठवड्यापर्यंत दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक जिल्ह्याला गेल्या चार दिवसात पावसाने दिलासा दिला आहे. चार दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे साठ टक्क्यांपर्यंत पाऊस येऊन पोहचला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com