Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकर्‍यांना दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर टेस्टची सक्ती नाही : जिल्हाधिकारी मांढरे

शेतकर्‍यांना दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर टेस्टची सक्ती नाही : जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

शेतकर्‍यांना बाजार समितीमध्ये येताना दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट करावी लागेल, अशी खोडसाळ माहिती पसरवली जात आहे. अधिकृत अधिसूचनेत अशी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनाने लागू केलेला दहा दिवसांचा लॉकडाऊन सोमवारपासून (दि.24) शिथील होत असून कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अटीशर्तींबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे समोर येत असून शेतकर्‍यांमध्ये होणारा गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हाप्रशासनाने सूचना जारी केली आहे.

राज्यशासनाने दिलेल्या अधिसुचनेनूसार बाजार समितीत प्रवेश करणार्‍या सर्वांची 15 दिवसांच्या आत आरटीपीसीआर किंवा रॅपिड चाचणी करून घेणे बाजार समितीवर बंधनकारक राहिल. बाजार समिती आवारात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असावे .

संपूर्ण बाजारात दररोज नियमितपणे सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात यावी. बाजार समिती आवारात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे तापमान नोंदवण्याची तसेच संबंधित व्यक्तींनी मुखपट्टी योग्य प्रकारे परिधान केली आहे का, याची तपासणी करण्याची व्यवस्था करणे अनिवार्य राहील. बाजार समितीत विविध गावांमधून व्यक्ती येत असल्याने करोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने बाजारात शेतमाल घेऊन येणार्‍या व्यक्ती पैकी जास्तीत जास्त व्यक्तींची कोविड तपासणी करणे बाजार समितीवर बंधनकारक राहील.

त्यासाठी बाजार समितीच्या आवारात तपासणी करण्याची सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावी. शारीरिक अंतर व करोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे योग्य ते पालन होण्याच्या दृष्टीने स्थानिक जागेची उपलब्धता विचारात घेऊन किती वाहनांना व किती व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा, याबाबत बाजार समितीने संख्या निश्चित करणे अनिवार्य राहील.

त्या मर्यादेतच प्रत्यक्ष प्रवेश दिला जाईल याकरीता आवश्यक ती संपूर्ण व्यवस्था करणे बाजार समितीवर बंधनकारक राहील. बाजार समितीच्या आवारात किरकोळ शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहतील. बाजार समितीतील सार्वजनिक वापराची सर्व ठिकाणी उदाहरणार्थ विश्राम व्यवस्था, स्वच्छतागृहे आदी सुविधा येणार्‍या व्यक्तींना गर्दी न करता पुरेशी राहील, याबाबत संपूर्ण काळजी घेणे अनिवार्य राहील.त्याकरीता आवश्यकतेनुसार फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे व त्या स्वच्छतागृहांची करोना प्रतिबंधाच्या दृष्टीने देखभाल करणे अनिवार्य राहील.

वरील नियमांचे पालन बाजार समिती करीत असल्याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे तत्काळ सादर करावा. वरील पैकी कोणतेही मुद्यांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास संबंधित आस्थापना करोना विषयक अधिसूचना मागे घेतली जाईपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रशासनाने दिला आहे.

शेतकर्‍यांना बाजार समितीमध्ये येताना दर आठ दिवसांनी आरटिपीसीआर टेस्ट करावी लागेल, अशी खोडसाळ माहिती काही मंडळी पसरवत आहेत. अधिकृत अधिसूचनेत अशी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या