पीकविमा भरपाईसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

नुकसान भरपाई मिळेपर्यंत ठिय्याचा निर्धार
पीकविमा भरपाईसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

निफाड । प्रतिनिधी Niphad

गत दोन वर्षांपासून रूई येथील शेतकरी पीक विमा ( crop insurance )हप्ता भरीत असतानाही व अतिवृष्टीमुळे या परिसरातील शेतीपिकांचे 100 टक्के नुकसान होऊनदेखील पीकनुकसान भरपाई या शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत पीकविमा भरपाई ( Crop insurance compensation )मिळाली नाही.

त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी काल 1 सप्टेंबरपासून चूल बंद आंदोलन सुरू केले असून तालुका कृषी अधिकारी ब. टू. पाटील, मंडळ अधिकारी चंद्रभान पंडित यांनी रूई येथे भेट देत या शेतकर्‍यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करत विमा कंपनी व वरिष्ठांना याबाबत कळवून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र पिकविमा रक्कम मिळेपर्यंत आपले चूल बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे या शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

सन 2019 व 2020 या दोन्ही आर्थिक वर्षात रूई येथील शेतकर्‍यांनी कृषी विभागामार्फत पीकविमा कंपनीच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरवला होता. मात्र त्याच वर्षी अतिवृष्टीमुळे रूई, देवगाव, धानोरे, नांदगाव, डोंगरगाव, कोळगाव परिसरातील शेतकर्‍यांचे फळ, पिकासह मका, सोयाबीन, तूर, मूग आदींसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परिणामी या शेतकर्‍यांनी महसूल, कृषी व पिकविमा कंपन्यांशी संपर्क साधत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.

त्यावेळी या तिनही विभागाचे अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देत शेतकर्‍यांची बोळवण केली होती. सतत दोन वर्षे पावसामुळे पिके वाया गेल्याने या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. पीकविमा हप्ता भरून देखील पीकविम्याची रक्कम मिळत नसेल तर मग पीकविमा कशासाठी उतरविला असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे. नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने पंचनामे केले नाही की, कृषी विभागाने दखल घेतली नाही. विमा कंपन्यांनीदेखील हात झटकले.

पीकविमा मिळावा म्हणून हे शेतकरी महसूल, कृषी व पिकविमा कंपनी या कार्यालयात अधिकार्‍यांकडे चकरा मारत राहिले. मात्र त्यांना कुणीही दाद दिली नाही. साहजिकच हताश झालेल्या रूई येथील शेतकर्‍यांनी काल 1 सप्टेंबरपासून चलू बंद आंदोलनास प्रारंभ केला असून जोपर्यंत पीकविमा रक्कम मिळत नाही तोपर्यंत चलू बंद आंदोलन सुरुच राहणार असल्याचे या शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

याप्रसंगी विलास तासकर, प्रकाश तासकर, वाल्मिक ठोंबरे, लक्ष्मीकांत रोटे, सुधाकर रोटे, दिलीप गायकवाड, भाऊसाहेब तासकर, नवनाथ तासकर, निवृत्ती चव्हाणके, प्रतीक रोटे, नवनाथ चव्हाणके, पुंजा शिंदे, अंबादास तासकर, सोमनाथ रोटे, बबन गायकवाड, माधव पोटे, सुभाष रोटे, राजाराम तासकर, गोरख तासकर, साहेबराव गायकवाड, नामदेव गायकवाड, शोभा रोटे, इंदूबाई गायकवाड आदींसह रूई, धानोरे परिसरातील पीक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

या आंदोलनाबाबत वरिष्ठांना कळविले आहे. आम्ही कृषी विभागाबरोबरच पीकविमा कंपन्यांशी संपर्क करून शेतकर्‍यांना पीकविमा रक्कम मिळाली पाहिजे, यासाठी त्यांचेकडे पाठपुरावा करीत आहोत. शेतकर्‍यांनी चूल बंद आंदोलन मागे घ्यावे व पशुधनाकडेदेखील लक्ष द्यावे. शेतकर्‍यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली असून त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

चंद्रकांत पंडित, मंडळ अधिकारी, देवगाव

दागिने गहाण ठेवून पैसे भरले

आम्ही दागिने गहाण ठेवून पीकविम्याचे पैसे भरले. आमच्या पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्याने दोन वर्षांपासून नुकसान भरपाईची मागणी करतो. त्यातच करोनामुळे आम्ही थांबलो होतो. पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र विमा कंपनीने आमची बोळवण केल्याने नाईलाजास्तव आम्हाला चूल बंद आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला. आता जोपर्यंत पीकविमा भरपाई मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आमच्या परिसरात रूई, देवगाव, धानोरे, नांदगाव, डोंगरगाव परिसरातील शेतकर्‍यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.

निवृत्ती चव्हाणके, शेतकरी (रूई)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com