Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआरोग्य मंत्र : लठ्ठपणा टाळण्यासाठी व्यायाम गरजेचा

आरोग्य मंत्र : लठ्ठपणा टाळण्यासाठी व्यायाम गरजेचा

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

माणसाच्या एकूण आजारांपैकी (Diseases) 60 ते 70 टक्के आजार हे लठ्ठपणामुळे (Obesity) होत असतात. लठ्ठपणा हा आता जागतिक आजार झाला आहे. हा लठ्ठपणा होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अयोग्य वेळी, अयोग्य पद्धतीने खाणे. नेमकेच पण व्यवस्थित जेवण (Meals) करणे आवश्यक असताना आवडले म्हणून मर्यादेपेक्षा जास्त जेवणे, शरीराला आवश्यक असलेल्या कॅलरीच्या तुलनेत अधिक कॅलरी (Calories) सामावून घेणे म्हणजे लठ्ठपणाला निमंत्रण दिल्यासारखे असते. हे टाळण्यासाठी नियमित व्यायामदेखील (Exercise) आवश्यक असतो.

- Advertisement -

दरम्यान, लठ्ठपणा हा अनुवांशिक, बैठे काम, व्यायामाचा अभाव, शरीरात कॅलरीचे जास्त प्रमाण, प्रमाणापेक्षा अतिजेवण, चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, एखादा रुग्ण फक्त अंथरुणावर खिळलेला असेल तर लठ्ठपणा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या दोन वर्षापासून आपण करोना (Corona) विषाणूचा सामना करत असताना अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट सुरु केली. ही कन्सेप्ट स्वीकारून अनेकांनी आपल्या घरीच कामाचा सेट अप उभारला. त्यामुळे बैठे काम वाढले आणि लठ्ठपणाला निमंत्रणच दिले गेले. तसेच आहारात गोड पदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणावर केला गेल्याने देखील लठ्ठपणा येत असतो.

लठ्ठपणा जर वाढला तर प्रामुख्याने गुडघेदुखीचा त्रास सुरु होतो. कारण शरीराचे संपूर्ण वजन आपले गुडघेच पेलतात. त्यांच्यावर नियमित भार दिला गेला तर गुडघेदुखी वाढते. तसेच रक्तदाब देखील (Blood pressure) वाढतो.

कॅलरी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन (Insulin) हे संप्रेरक आवश्यक असते. आहारात जास्त कॅलरी झाल्याने शरीर वाढते. त्यामुळे कॅलरी नियंत्रित करण्यासाठी शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यानंतर मधुमेह (Diabetes) हा आजार वाढीस लागतो.

लठ्ठपणा नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, आवश्यक तेवढेच जेवण, आहारात जंक फूडचा समावेश नसणे, फक्त खात राहणे टाळणे, नियमित बैठे काम असल्याने चालणे, पळणे किंवा पोहणे या प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीरातील कॅलरीचे प्रमाण नियंत्रित राहते.

- Advertisment -

ताज्या बातम्या