प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशकात वक्तव्य
प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात प्रत्येकाने थोडे तारतम्य ठेवून वागावे. सगळीकडे शांतताच राहीली पाहिजे. राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावं हा आमचा कायम प्रयत्न असतो; काल झालेल्या घटनेबाबत तपास यंत्रणा म्हणून पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करतील. कायदा हातात घेण्याचे काम कोणीच करू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar )यांनी दिला. तसेच राष्ट्रपती राजवटीबाबत विरोधकांनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न असेदेखील पवार म्हणाले.

नाशिक येथे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या (Criminal Investigation Training School at Nashik )नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत एक खासदार आणि एक आमदार यांनी मातोश्रीला येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्णय घेतला. कोणी कुठे काय म्हणावे हा ज्याचा-त्याचा लोकशाही अधिकार आहे. याबद्दल कुणाचे दुमत असण्याचं कारण नाही, पण त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याचे भान ठेवायला हवे होते.

काल झालेला हल्ला चुकीचाच होता, पण कोणीच कोणाला उचकवण्याचे काम करु नये, असेही पवार म्हणाले. इकडे जाऊ नका, वातावरण तंग आहे, असे राज्यातील पोलीस यंत्रणेकडून आम्हालासुद्धा अनेकदा सांगितले जाते. तेव्हा आम्ही त्यांचे ऐकतो. पोलिसांनी राणा दाम्पत्याला येऊ नका सांगितले, पण ते आले. त्यांच्या खारमधील फ्लॅटवर ते थांबले. त्यामुळे व्हायला नको ते झाले व वातावरण खराब झाले. तरीसुद्धा पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले, असे पवार यांनी नमूद केले.

राज्याचे गृहमंत्री या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून होते. काही लोकांच्या भावना तीव्र झाल्या. मातोश्रीबद्दल आजच नाही तर बाळासाहेब असल्यापासून शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यांचे दैवत म्हणून ते त्यांच्याकडे पाहतात. राष्ट्रवादीच्या लोकांची पवार साहेबांबद्दल, काँग्रेसच्या लोकांची सोनियाजींबद्दल, भाजपच्या लोकांची मोदींबद्दल हीच भावना आहे, पण जी घडली ती घटना घडायला नको होती.

पोलीस पोलिसांचे काम व्यवस्थित करतील. सीसीटीव्ही कॅमेरे, मीडियाचे कॅमेरे होते. प्रत्येकाने थोडे तारतम्य बाळगून वागले पाहिजे. सगळीकडे शांतताच राहिली पाहिजे. राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावे हा आमचा कायम प्रयत्न असतो. पवार साहेबांची आम्हाला तशी शिकवण आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न : गृहमंत्री

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा किंवा अस्थिर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यामधून आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न होत आहे, पण ते शक्य नाही. पोलीस परिस्थिती नियंत्रणात ठेवतील. पोलिसांनी राणा दाम्पत्यावर काल केलेली कारवाई नियमानुसारच आहे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती. अटकेतील व्यक्तीला भेटायला नातेवाईक किंवा वकील जायला पाहिजेत, असेही गृहमंत्री म्हणाले.

Related Stories

No stories found.