देशातील प्रत्येक शेतकरी, मजूर तपस्वी

राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र
देशातील प्रत्येक शेतकरी, मजूर तपस्वी

नांदेड । वृत्तसंस्था Nanded

भारत देश तपस्वींचा आहे, महापुरुषांसमोर आपण हात जोडतो ते त्यांच्या कार्यामुळे तपस्येमुळेच.या देशातील प्रत्येक मजूर, छोटा व्यापारी तपस्वी आहे. तर मोदी एक वेगळेच तपस्वी आहे. त्यांची तपस्या अश्रूंची आहे, अशी टिका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ( MP Rahul Gandhi )यांनी केली.काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा (Congress' Bharat Jodo Padayatra)काल नांदेड शहरात दाखल झाली.राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा येथे झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले, नोटबंदी, चुकीची जीएसटी, पाच वेगवेगळे कर, स्वतंत्र भारतात शेतकरी, त्यांचे अवजार, खतांवर कर लागला. विरोधक म्हणतात, एवढे पायी चालत आहेत काहीही फरक पडणार नाही. पण मी म्हणतो ही गोष्ट सहज आहे, चालणे सोपे आहे, मी थकत नाही. कारण शेतकरी, मजूर, कष्टकर्‍यांची शक्ती माझ्यामागे आहे. नोटबंदीमुळे सर्वसामान्यजन त्रस्त झाले. काळे धन उलट वाढले आहे, शेतकरी त्रस्त आहेत. रोजगार हातातून गेले.

महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गायब झाले. तसेच तुम्हाला आश्वासन दिलेले पंधरा लाखही गायब झाले. भाजपच्या पॉलिसीमुळे भय उत्पन्न होते.भारत देश तपस्वींचा आहे, महापुरुषांसमोर आपण हात जोडतो ते त्यांच्या कार्यामुळे तपस्येमुळेच. या देशातील शेतकरीही तपस्या करतो, सर्व वर्ग तपस्या करतो पण त्यांना फळ मिळत नाही. ते मेले तरीही त्यांना फळ मिळत नाही,अशी खंत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

यावेळी राहुल गांधी यांनी आरएसएस आणि काँग्रेसच्या लोकांमधील फरक सांगितला. राहुल यांनी केदारनाथ दर्शनातील किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मला केदारनाथ येथे एक आरएसएसचे नेते भेटले होते. त्यांचे वजन साधारण 100 किलो असेल. दर्शन झाल्यावर त्यांना विचारले काय मागितले. तेव्हा ते म्हणाले की, मी चांगली प्रकृती मागितली. वास्तविक ते हेलिकॉप्टर ऐवजी चालत आले असते तर प्रकृती चांगली झाली असती. पण मी काही मागितले नाही, मला रस्ता दाखवल्याबद्दल महादेवाचे आभार मानले. हा फरक आहे, सावरकर आणि गांधीजींच्या विचारांचा. हा फरक आहे काँग्रेस आणि आरएसएसमध्ये.आम्ही बोलत नाही, करतो, असेही राहुल यांनी म्हटले.

राष्ट्रवादीचा सहभाग

यावेळी राष्ट्रवादीच्या काँग्रेसचे नेते खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यात्रेत सहभाग घेतला. वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील याही चालताना पाहायला मिळाल्या आहेत. बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते असो की, शेतकरी सर्वजण या यात्रेत सहभागी झाले आहेत.त्यांच्या सहभागाने यात्रेस आणखी बळ मिळाल्याचे चित्र होते. खा. सुळे आणि जयंत पाटील यांनी यात्रेकरुंसोबत संवाद साधला.

आदित्य ठाकरे आज सहभागी होणार

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे हेही आज सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com