आमदार बाद झाले तरी सरकार राहणार

अजित पवार यांच्या दाव्याने राज्यात खळबळ
आमदार बाद झाले तरी सरकार राहणार

नागपूर । वृत्तसंस्था

16 आमदार अपात्र झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावे लागेल, असे बोलले जात आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र 16 आमदार बाद झाले तरी सरकार जाणार नाही, असा दावा केला आहे. शिंदे सरकार कसे टिकेल, तेही पवार यांनी समजावून सांगितले.

अजित पवार यांनी येथे माध्यमांशी संवाद साधताना शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत आश्चर्यकारक दावा केला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. सरकार कसे टिकेल त्याचे गणितच पवार यांनी मांडले. 16 आमदार अपात्र ठरतील, असे सांगितले जात आहे. अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. त्यात 106 भाजपचे आमदार आहेत. तर 6 अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. असे मिळून 115 आमदार भाजपकडे आहेत. तर एकनाथ शिंदेंकडे 40 आमदार आहेत. शिंदे यांच्यासोबतचे 10 अपक्ष बाजूला ठेवा. कारण अपक्ष सत्ता असते तिकडे जातात. तूर्तास त्यांना गृहित धरू नका.

शिंदे यांच्याकडे केवळ 40 आमदार आहेत असे समजा. शिंदे यांचे 40 आमदार आणि भाजपचे 115 आमदार मिळून आमदारांची संख्या 150 होते. शिवाय आठ दहा लोकं म्हणजे बच्चू कडू, रवी राणा आणि इतर असे 10 अपक्ष आमदार युतीसोबत येतील. म्हणजे 115, 10 आणि 40 आमदारांची गोळाबेरीज केल्यास ही संख्या 165 होतात. त्यातील 16 आमदार अपात्र होऊन कमी झाले तर युतीकडे 149 आमदार उरतात. बहुमताचा आकडा (मॅजिक फिगर) 145 आहे. मग कारण नसताना वावड्या उठवण्याचे काम का सुरू आहे? असा सवालही पवार यांनी केला.

पवार म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे युतीकडील आमदारांची संख्या 149 राहते. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 आहे. या288मधील 16 आमदार गेल्यावर विधानसभेची सदस्य संख्या 272 होते. 272 सदस्यसंख्या झाल्यावर बहुमताचा आकडाही कमी होतो. तो किती राहतो ते पाहा. त्यामुळे तुम्हाला गणित समजेल. ही वस्तुस्थिती आहे. आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. कारण नसताना चित्र रंगवण्यात गरज नाही. कोणाबद्दल शंका निर्माण करू नका, असेही पवार म्हणाले.

आघाडीच्या सात सभा

महाविकास आघाडीच्या राज्यात 6 ते 7 सभा होणार आहे. येत्या 1 मेस मुंबईत सभा होणार आहे. 11 जूनला अमरावतीत सभा होणार आहे. प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांना भाषण करण्याची संधी द्यायची, हे सूत्र आघाडीने ठरवले आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून स्थानिक नेते म्हणून आज नागपुरात अनिल देशमुख बोलतील. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतील. काँग्रेसकडून नाना पटोले आणि केदार भाषण करतील. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे भाषण करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com