Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकानमंत्र उन्हाळ्यातील थंडाव्याचे!

कानमंत्र उन्हाळ्यातील थंडाव्याचे!

नाशिक | डॉ. शीतल भूषण सुरजुसे | Nashik

हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी (Holi) झाली की वातावरणातील तापमान (Temperature) वाढू लागते. वातावरणात होणार्‍या तीव्र बदलांशी शरीर पटकन जुळवून घेऊ शकत नाही. साहजिकच त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर (Health) होतो. भूक कमी तर तहान खूप लागते. खूप घाम आल्यामुळे अंगाची चिकचिक होते. घामोळे उठते. थकवा येणे, चिडचिड होणे अशी सर्वांचीच अवस्था होते.

- Advertisement -

आपला उन्हाळा (Summer) थोडा सुसह्य व्हावा यासाठी काही टीप्स. उन्हाळा सुरू झाल्यावर एकदम थंड पाण्याने आंघोळ सुरू न करता आधी कोमट मग सोसेल असे थंड पाणी वापरावे. आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्यास अतिशय फ्रेश वाटते. आंघोळीसाठी साबणाऐवजी वाळवलेली संत्रा साल / लिंबुसाल पावडर, वाळा पावडर, नागरमोथा पावडर यांचे मिश्रण वापरावे.

घामोळ्याचा त्रास होत असेल तर उकडलेल्या कैरीचा गर, खरबूजाचा गर लावून आंघोळ करावी. कडुलिंबाची पाने रात्री आंघोळीच्या पाण्यात टाकून ते पाणी (Water) सकाळी आंघोळीसाठी वापरल्यास उन्हाळ्यात होणार्‍या सर्वच त्वचारोगापासून रक्षण होण्यास मदत होईल.

दुपारच्या उन्हात फिरणे शक्यतो टाळावे. जाणे अपरिहार्य असेल तर छत्री, रूमाल, टोपी, स्कार्फ, गॉगल यांचा वापर करावा. मऊ, सुती कपडे वापरावेत. घरातून बाहेर निघण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा अधिक एसपीएफ असणारे सनस्क्रीन वापरावे.

मोगरा, जाई, चमेली, सोनचाफा यांचे गजरे किवा अत्तर वापरण्यास हरकत नाही. यांच्या नैसर्गिक सुगंधामुळे वातावरण व मन दोन्ही प्रसन्न राहते. जास्त उत्साहाने तीव्र व्यायाम करणे टाळावे. सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने करावी. माठातील पाण्यात वाळ्याची जूडी किंवा मोगर्‍याची चार फुले आलटून-पालटून टाकून ते पाणी पिण्यास वापरावे. हे उत्तम तृष्णाशामक आहे.

घरी तयार केलेले ताजे लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब, वाळा, बेल यांची सरबते, फळांचा ताजा रस, जलजीरा, ताक, नारळपाणी अशा नैसर्गिक पेयांचा समावेश करावा तसेच कैरीचे पन्हे,उसाचा रस, कलिंगड, खरबूज, संत्री यांच्या रसाचे सेवन करावे. त्यामुळे शरीरातील क्षारांची हानी भरून निघेल आणि थकवाही कमी होईल.

उन्हाळी लागली असेल, लघवीला जळजळ होत असेल रात्री 1 लीटर पाण्यात 2 चमचे धने व 2 चमचे जीरे भिजत घालावे व दिवसा हे पाणी पिण्यास वापरावे. नाकातून रक्त येत असेल तर नाकात दुर्वाचा रस घालावा. ताजी नीरा उष्णता कमी करण्यास मदत करते. शरीरातील अतिरिक्त उष्णता घालवण्यासाठी, तळपायांचा दाह शमवण्यासाठी डोक्याला किंवा तळपायाला मेंदी किंवा दुर्वांचा ताजा रस किंवा चंदनाचा लेप लावावा.

या ॠतुत येणारी फळे कलिंगड, खरबूज, आंबा, रानमेवा (जांभूळ, करवंद, जाम, राय आवळा, बोरं, ताडगोळे) यांचा आस्वाद नक्की घ्यावा. कलिंगड, खरबूज कापल्यानंतर त्यांची साल टाकून न देता आतील बाजूने चेहऱ्यावर हलका मसाज करावा त्यामुळे त्वचा तजेलदार होईल. दिवसातून एकदा चेहऱ्यावर गुलाबजल लावावे. गुलाबजल, काकडीचा रस यांत भिजवलेले कापूस किंवा काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावे याने डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत होईल. गुलकंद, सब्जा यांचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होईल.

उन्हाळ्यातल्या उन्हामुळे डोके दुखत असेल तर बडीशेप वाटून डोक्यावर लेप लावावा. डोके दुखणे थांबते. ओल्या नारळाचे दूध पित्तशामक असते व शरीरास थंड ठेवते. ओल्या नारळाचे दूध नैसर्गिक ताणनाशक आहे. त्यापासून तयार केलेली सोलकढीचा आहारात समावेश करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या