नवीन नाशकात अतिक्रमण निर्मूलनाला वेग येणार

नवीन नाशकात अतिक्रमण निर्मूलनाला वेग येणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नवीन नाशिक परिसरात अतिक्रमणधारकांना महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या असून नवीन नाशिक विभागीय कार्यालयातर्फे सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस आता वेग आला असून केवळ राजकीय हस्तक्षेप न झाल्यास नवीन नाशिक अतिक्रमण मुक्त होऊ शकेल.

कामगार वसाहत म्हणून ओळख असलेल्या नवीन नाशिक परिसरात सिडको प्रशासनाने 1 ते 6 योजनांची निर्मिती करून सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात घरे उपलब्ध करून दिली होती. मात्र लोकसंख्या वाढीसोबतच परिसरात अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणात वाढीस आले. महापालिकेतर्फे यापूर्वी बर्‍याच वर्षांपूर्वी त्रिमूर्ती चौक परिसरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या घरांच्या अतिक्रमणांवर मार्किंग करण्यात येत होती.

मात्र राजकीय हस्तक्षेप व लोकांचा कडाडून विरोध झाल्याने प्रशासनाला हि मोहीम बंद करणे भाग पडले.त्यानंतर गेल्या काही महिन्यांपूर्वीच महापालिकेतर्फे सहाही विभागात पथक नेमून सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये नवीन नाशकात सर्वाधिक प्रमाणात अतिक्रमण असल्याचे आढळून आले. शहराप्रमाणेच नवीन नाशिक मध्ये देखील नोटीस वाटप करण्यात आले.

नवीन नाशिक परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सुमारे 90 ते 95 टक्के घरांचा वापर हा व्यवसायासाठी करण्यात येत आहे. निचे दुकान उपर मकान हि हिंदी म्हण या ठिकाणी तंतोतंत लागू होते. आगामी काळात या घरांसह गल्ली बोळात असलेल्या सिडकोच्या घरांनी देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले. भविष्यात याठिकाणी जर काही मोठी दुर्घटना घडली तर अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळापर्यंत पोहोचणे अवघड होणार असल्याने भविष्यात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची टांगती तलवार याठिकाणी असलेल्या अतिक्रमित घरमालकांवर राहणार आहे.

सध्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयातर्फे रस्त्यावर अडचण ठरणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु आहे. मार्च महिन्यात महापालिकेचे कर्मचारी घरपट्टी वसुलीसाठी व्यस्त होते मात्र आता त्यांचे काम बर्‍यापैकी संपल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग येतो का हे तर आगामी काळच ठरवेल मात्र अधिकार्‍यांशी चर्चेत आता या मोहिमेला वेग येईल असा सूर दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com