ज्येष्ठ पर्यावरणवादी, हिमालय रक्षक 'सुंदरलाल बहुगुणा' यांचं निधन

ज्येष्ठ पर्यावरणवादी, हिमालय रक्षक 'सुंदरलाल बहुगुणा' यांचं निधन

दिल्ली | Delhi

देशभरात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये बाधित आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.

चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणांचे यांचे निधन झाले आहे. सुंदरलाल बहुगुणा यांनी आज दुपारी १२ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ९४ वर्षांचे होते. सुंदरलाल बहुगुणा यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, "सुंदरलाल बहुगुणा जी यांचे निधन हे आपल्या देशासाठी खूप मोठे नुकसान आहे. निसर्गाशी सुसंगत राहण्याची आपली वर्षांनुवर्षाची परंपरा त्यांनी जपली. त्यांचा साधेपणा आणि करुणता ही न विसरण्यासारखी आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती."

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनीही ट्विटरवरून सुंदरलाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रावत यांनी म्हटलं की, चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी पद्म विभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाचे वृत्त मिळाले. हे ऐकून धक्का बसला. फक्त उत्तराखंडचे नाही तर संपूर्ण देशाचे कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना 1986 मध्ये जमनालाल बजाज आणि 2009 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल.

त्यांच्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री (१९८१), जमनालाल बजाज (१९८६), राईट लाईवलीहूड (१९८७), पद्मविभूषण (२००१) अशा पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. विज्ञानाची डॉक्टरेट पदवी आयआयटी, रुडकीकडून मिळाली (१९८९). प्रत्येक गोष्टीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणारे सुंदरलाल बहुगुणा पर्यावरण गांधी तसेच वृक्षमित्र म्हणून ओळखले जातात. तसेच आयुष्यभर त्यांनी हिमालयाच्या संरक्षणासाठी आंदोलन केलं. त्यामुळे त्यांना 'हिमालय रक्षक' म्हणूनही संबोधलं जातं.

चिपको आंदोलन

महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली.

टेहरीसाठी उपोषण

टेहरीसारख्या मोठ्या धरणालाही सुंदरलाल बहुगुणा यांचा विरोध होता. १९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी टेहरी धरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. धरणाचे काम सुरूच राहिल्यांने बहुगुणांनी महात्मा गांधींच्या समाधिस्थळाजवळ बसून ७४ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण केले. काम तात्पुरते थांबले. मात्र २००१ साली या धरणाचे काम परत सुरू झाल्यावर सुंदरलाल बहुगुणा यांना अटक झाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com