निमा अध्यक्षांच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी उद्योजक राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात

आज आयमात पुढील रूपरेषा ठरणार
निमा हाऊस
निमा हाऊस

नाशिक | प्रतिनिधी

निमाचे (Nima) अध्यक्ष धनंजय बेळे (Dhananjaya Bele) यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) काही संशयितांवर गुन्हे दाखल केले असले तरी त्याबाबतच्या कार्यवाहीला अधिक गती मिळावी आणि हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी ही मागणी जोर धरत आहे...

त्याचाच एक भाग म्हणून उद्योजकांतर्फे राज्यव्यापी आंदोलनाची (Statewide movement) हाक देण्यात आली असून त्याची दिशा व रूपरेषा ठरविण्यास मंगळवारी (दि 30 मे) दुपारी 3 वाजता अंबड येथील आयमा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निमा व आयमच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

काही अज्ञातांनी बेळे यांच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील एसएस इंटरप्राइजेस कंपनीत घुसून भ्याड हल्ल्याचा (Attack) प्रयत्न केला. हल्लेखोरांनी तेथे उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व घोषणाबाजी केली.याप्रकरणी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांची भेट घेऊन हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून हल्लेखोरांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

नंतर काही जणांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले. मात्र त्यानंतर पुन्हा कारवाई ठप्प झाल्याने संतप्त झालेल्या उद्योजकांनी निमा व आयमा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व एमआयडीसीचे निरीक्षक राजू पाचोरकर यांची भेट घेऊन दाखल गुन्ह्याबाबत चौकशी करून पुढील कारवाई करण्याची मागणी केली असता याबाबत चौकशी सुरू असून लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे संकेत यांच्याकडून देण्यात आले.

परंतु या आश्वासनाने उद्योजकांचे समाधान न झाल्याने राज्यव्यापी आंदोलनाच्या मागणीवर ते सर्व ठाम असून त्याची रूपरेषा आखण्यासाठी अंबडच्या आयमा कार्यालयात आज उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे.हा हल्ला म्हणजे राज्यातील उद्योग जगतावर हल्ला असून आम्ही तो मुळीच खपवून घेणार नाही असा इशारा राज्यभरातील उद्योजकांनी दिला आहे दरम्यान राज्यव्यापी आंदोलनाबाबत नाशिकचे उद्योजक जो निर्णय घेतील त्याला आमचा सक्रिय पाठिंबा राहील असे आश्वासन राज्यभरातील उद्योजकांनी दिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com