सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश; गळती रोखण्याचे आव्हान कायम

सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश; गळती रोखण्याचे आव्हान कायम

नाशिक | फारूक पठाण | Nashik

पक्ष प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बहुचर्चित मालेगावची (malegaon) सभा दोन दिवसापूर्वी मोठ्या धुमधडाक्यात झाली.

ज्या मैदानात सभा झाली तेथील आतापर्यंत झालेल्या सर्व सभांचे उच्चांक ठाकरेंच्या सभेमुळे मोडले गेले. याला कारण ही तसे होते. मालेगावचे वजनदार नेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनीही सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले मात्र दुसरीकडे जिल्ह्यातून शिवसेनेत (shiv sena) इन्कमिंग सुरूच असून ठाकरे गटाला आपल्या पक्षातील गळती रोखणे आव्हान आहे.

मालेगांवच्या सभेचे नियोजन अत्यंत चोखपणे करण्यात आले होते. यासाठी पक्षाचे नेते खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) साधारण तीन दिवस नाशिक जिल्ह्यात (nashik district) मुक्काम ठोकून होते. त्याचप्रमाणे कोकण भागातील ज्येष्ठ नेते खा. विनायक राऊत यांच्यासह उद्धव गटाचे वरिष्ठ नेत्यांनी सतत मालेगावच्या सभेकडे लक्ष केंद्रित केले होते, तर दुसरीकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये देखील उत्साह जाणवला. नाशिक शहरातील विविध आजी-माजी पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींची यामध्ये वज्रमूठ पाहायला मिळाली. सुमारे 100 वाहने शहरातून सभेकडे निघाली होती.

अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भाषण देखील तसे दमदार झाले. त्यांनी त्यांना सोडून गेलेले ना. भुसे यांच्यासह नांदगावचे आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande), जळगावचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आदींना लक्ष केले. सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही मात्र मागच्या वेळेला कांद्याला चांगले भाव मिळाल्याचे सांगत त्यांनी सुहास कांदे यांच्यावर चिमटा काढला. तर दुसरीकडे आपली कट्टर हिंदुत्वाची छवी आणखी मजबूत करण्यासाठी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांचे देखील कान टोचले.

त्यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत सावरकरांबद्दल बोलू नका अशी तंबीच गांधी यांना दिली. ते आमचे दैवत आहे असेही ते सांगायला विसरले नाही तर दुसरीकडे मालेगावच्या पावरलूम उद्योगबद्दल बोलताना वस्त्र उद्योग आयुक्त यांचे कार्यालय मुंबईला असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तो दिल्लीला नेल्याचा आरोप केला. त्यामुळे पावरलूम मध्ये काम करणाऱ्या बहुसंख्यांक मुस्लिम समाजाला देखील त्यांनी आपण त्यांची बाजू घेत असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितल्याचे दिसून आले. करोना (corona) काळात मी जरी घरी होतो तरी तिथून मुंबईतील धारावी तसेच मालेगावची परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो.

मी वेळोवेळी तुम्हाला आवाहन करायचं व तुम्ही माझ्या सूचनांचे पालन केल्यामुळे आपण ही लढाई जिंकल्याचे समाधान असल्याचे देखील त्यांनी सांगत मालेगावकरांचे आभार मानले. अशा विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य करून जमलेल्या लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला असला तरी मात्र स्वतःच्या पक्षातील लोक सतत सोडून जात असल्यामुळे ती गळती कशी थांबवणार याबद्दल त्यांनी काहीच बोलले नाही.

मालेगाव मध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होती तर सकाळीच शिवसेनेने उद्धव गटाला नाशिक मधून "जोर का झटका" देत माजी सभापती, माजी नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. ठाणे येथील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाले. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या शिवसेनेच्या वाटचालीत विविध आंदोलनांमध्ये अग्रभागी राहणाऱ्या महिला आघाडीच्या धडधडीच्या महीला नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हा मोठा धक्का उद्धव गटाला मानला जात आहे.

जिल्हाप्रमुख शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, माजी नगरसेविका अँड.श्यामला दीक्षित,माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे, ज्योती देवरे, मनपा शिक्षण मंडळ माजी सभापती शशिकांत कोठुळे अशा शहरातील दिग्गजांसह त्रंबक तालुक्यातील अनेक शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. एकीकडे उद्धव ठाकरे नाशिकला येत असतानाच दुसरीकडे सकाळी आपल्याच पक्षातील सुमारे तीन डझन नेते, माजी पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे गटाला गळती थांबवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com