आजपासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी

३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू
आजपासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी

मुंबई |प्रतिनिधी

करोनाच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी राज्यात आज, सोमवारपासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात मिनी लॉकडाऊन आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत विकेंड लॉकडाऊन असेल. हे निर्बंध ३० एप्रिलपर्यंत लागू राहतील.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आज रात्री आठ वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, सलून, ब्युटीपार्लर, हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आदी बंद राहणार आहेत. भाजीमंडई, किराणामाल, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. मात्र, ग्राहकांना येथे गर्दी करता येणार नाही.

शेती आणि शेतीविषयक कामे, अन्नधान्य तसेच शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील. शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र दहावी आणि बारावी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांना रात्री आठ ते सकाळी सातवाजेपर्यंत योग्य कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही.तर दिवसा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही. बस, ट्रेन यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू राहतील. रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार असून त्यांच्यावर प्रवासी संख्येचे बंधन घालण्यात आले आहे. रिक्षा, टॅक्सीतून दोन प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रात्रीची परवानगी असणार आहे.

धार्मिक स्थळांवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम असणार आहेत. फक्त धर्मगुरूंना पूजा, प्रार्थना करता येणार आहे. मैदाने, उद्याने पूर्णपणे बंद असतीलत. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. चित्रपट, मालिकांच्या शुटींगवरही मर्यादा घालण्यात आली आहे.

तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट

पाचपेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावण्यात येणार असून बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी असणार आहे.

आजपासून नवे निर्बंध

रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, दिवसा गर्दी केल्यास कलम १४४ नुसार कारवाई होणार

मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, पार्सल सेवा, होम डिलिव्हरी सुरु राहणार

सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाणार

राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.

सर्व बांधकामे सुरु राहतील

भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील

शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार

सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक

सर्व सार्वजनिक वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार

बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकतात.

अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या दुकानातील दुकानदार ,कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे.तसेच स्वत: आणि ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे

सार्वजनिक आणि खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.

खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील

शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल

ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस एक हजार रुपये आणि संबधित दुकान किंवा संस्थेस १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल. मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे

चित्रीकरण सुरु ठेवता येईल. मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी आणि चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.

शनिवार, रविवार कडकडीत बंद

राज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार काही गोष्टी सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार आणि रविवार कठोर निर्बंध असणार आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com