
कागल| Kagal
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने (Enforcement Directorate) पहिली कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर सकाळी ६ वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात आम्ही मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे दिली होती. पण हा घोटाळा दाबण्यात आला होता. आता हे प्रकरण पुन्हा उजेडात आलं असून त्यानुसार कारवाई झाल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटीचं कंत्राट दिलं होतं. त्यामुळे मुश्रीफ यांच्या जावयाला आर्थिक लाभ मिळाला होता. त्याचीही चौकशी होत असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.