
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महिला बचत गट तयार करत असलेल्या विविध उत्पादनांसाठी लागणारी अत्याधुनिक साधन-सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. येथील पंचायत समिती नाशिकच्या आवारात आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाज्या महोत्सव व राखी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भुसे बोलत होते.
व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, पंचायत समिती गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. भुसे म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानातून अनेक दुर्गम भागात आदिवासी महिला व बचतगट यांना रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. या बचत गटांना गरजेनुसार साहित्याची उपलब्धता व्हावी व उत्पादित मालाची विक्री होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची उपलब्धता केली जाणार आहे.
रानभाजी महोत्सवासोबतच राखी महोत्सव आणि बचतगटांनी तृणधान्यापासून तयार केलेले पौष्टीक खाद्यपदार्थ व कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल्स येथे नाशिककरांना उपलब्ध झाले आहेत. वाढते प्रदुषण व रासायनिक खते, तणनाशकाच्या फवारणीद्वारे पिकविलेला भाजीपाला यामुळे होणार्या दुष्परिणामास आपणास आज सामोरे जावे लागत आहे. परंतु निसर्गात पिकलेल्या भाज्यांचे औषधी गुणधर्म आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्व असाधारण स्वरूपाचे आहे. करोना काळात सर्वांना जीवनाचे महत्व समजले असून हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून जगभरात साजरे होत आहे. दैनंदिन आहारात पौष्टीक तृणधान्याचा समावेश आपण वाढविला पाहिजे. रानभाजी महोत्सव हा आजपासून 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
परंतु यांनंतरही महिला बचतगटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ,वस्तू यांच्या विक्रीसाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या आवारात महिला बचतगटांना स्टॉल्ससाठी प्रशासानाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उभारी मिळण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नाही. राखी पौर्णिमा हा पवित्र सण आहे. आज इेपवळपस डीेींळशी या ब्रँण्डचे आनावरण झाले असून या ब्रँण्डच्या माध्यमातून कल्पकतेने तयार केलेल्या विविध प्रकारच्या राख्या व भेटवस्तू नाशिककरांना उपलब्ध झाल्या आहेत. सर्व नागरिकांनी या महोत्सवास भेट देवून आरोग्यवर्धक रानभाज्या, व बनविलेल्या वस्तू खरेदी कराव्यात तसेच रानभाज्या बनविण्याची पाककृतीची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
राधाकृष्ण गमे म्हणाले, मालेगाव शहरात अनेक पॉवर लूम्स आहेत. त्यातून तयार होणारे कापड उत्पादन हे स्थानिक बाजरपेठ नसल्यामुळे विक्रीसाठी बाहेर पाठविले जाते. परंतु जिल्ह्यातच या कापड उत्पादनास विक्री व्यवस्था तयार केली तर लूम कारागीर हे मुख्य प्रवाहात येवून त्यांचेही जीवनमान उंचावण्यास नक्कीच हातभार लागणार आहे. त्यामुळे या उत्पादनास जिल्हास्तरावर मुल्यवर्धनातून बळकटी देण्यासाठी प्रयत्न करू.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, रानभाजी महोत्सव व प्रदर्शनाच्या आयोजनात उमेदची भूमिका निश्चितच महत्वाची असून हा उपक्रम स्तुत्य आहे. जागतिक स्तरावर हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. बचतगटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगातून अनेक पदार्थ तयार करून विक्री केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातही या उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. दुर्मिळ रानभाज्या व त्यातील औषधी गुणधर्माचे महत्त्व शहरी भागातील नागरिकांना कळावे, त्यांची चव घेता यावी याकरिता 31 ऑगस्ट पर्यंत नाशिक पंचायत समितीच्या आवारात सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 यावेळेत रानभाज्या महोत्सव व राखी महोत्सव सुरू राहणार असून नागरिकांनी महोत्सवास भेट द्यावी असे आवहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.