Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामहसूल वसुलीवर शंभर टक्के भर द्या : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

महसूल वसुलीवर शंभर टक्के भर द्या : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विभागाला देण्यात आलेल्या महसूल वसुलीच्या उद्दीष्टात नाशिक जिल्ह्याचा सर्वात मोठा वाटा आहे. जिल्ह्याला जमीन महसुलीचे 86 कोटी 50 लाख तर गौण खनिजाचे 142 कोटी 50 लाख रुपयांचे वसुलीचे उद्दीष्टे देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व अधिकार्‍यांनी शंभर टक्के वसुली करण्यावर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व अधिकार्‍यांना दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत गमे बोलत होते. गमे म्हणाले, नाशिक जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दीष्टांपैकी जमीन महसुलीचे उद्दीष्टे 28.48 टक्के तर गौण खनिजाचे 38.65 टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरीत उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व अधिकार्‍यांनी योग्य नियोजन करून महसूल वसुलीचे उद्दीष्ट्ये पूर्ण करावे. तसेच शासनाचा महसुलाची वसुली करणे हा उद्देश नसून अनधिकृपणे चालणार्‍या कामांना आळा घालणे हा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रांत अधिकार्‍याने व तहसीलदारांनी गौण खनिजाच्या अनधिकृतपणे होणार्‍या उत्खननावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

पेठ व सुरगाणा तालुक्यात शासकीय किंवा खासगी जागांचा शोध घेऊन नवीन दखडखाणींचे नियोजन करावे. अनेक तालुक्यातील अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी प्रत्येकाने जागृकपणे काम करणे आवश्यक आहे. ईटीएस मशिनद्वारे मोजणी करून परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खणन झाल्याचे आढळल्यास त्या ठिकाणी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी संबंधितांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या. अनधिकृतपणे चालणारी खडी क्रशर बंद करुन वसुलीची कारवाई करण्यात यावी. तसेच मागील दहा वर्षातील प्रलंबित वसुलीच्या प्रकरणांवर कारवाई करुन प्रकरणे निकाली काढावेत. जेणेकरुन महसूल वाढीवर त्याचा चांगला परिणाम होईल.

चलन प्रणालीचा वापर करुन 42 ब व 42 क च्या अनुषंगाने बिनशेती सनद वाटपाच्या कामाला गती देण्यासाठी चलन प्रणालीचा वापर करण्यात यावा, असे गमे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त अर्जुन चिखले, उपायुक्त अरुण आनंदकर, सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंढावरे आदी उपस्थित होते.

सातबारा संगणकीकरणाचे काम चांगले

सातबारा संगणकीकरणामुळे रेकॉर्ड चांगल्याप्रकारे जतन करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे काम समाधानकारक झाले असल्याने त्याबाबत गमे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच येणार्‍या काळात अर्जदारांना नोटिसा किंवा सूचना व्हॉटसपद्वारे पाठविण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या