विकासकामे पूर्ण करण्यावर भर द्यावा

बैठकीत पालकमंत्री भुसे यांच्या सूचना
विकासकामे पूर्ण करण्यावर भर द्यावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान व जलजीवन मिशन या विभागांच्या आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपवनसंरक्षक उमेश वावरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, नाशिक व कळवणचे सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान, विशाल नरवाडे उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, मनरेगा अंतर्गत करण्यात येणार्‍या कामांमध्ये घरकुल, सार्वजनिक शौचालय, विहिरी या व्यतिरिक्त इतर कामे देखील घेण्यात यावीत. त्यात आदर्श शाळा, शाळांच्या संरक्षक भिंती, साखळी बंधारे अशा विविध कामांचा समावेश या कामांमध्ये करण्यात यावा. मनरेगा अंतर्गत 101 कोटींचा खर्च केला. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व मजुरांनी केलेल्या कामाचे कौतुक भुसे यांनी यावेळी केले.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून गावांचा व कामांचा क्रम ठरविण्यात यावा. तसेच ज्या ठिकाणी कमी जागेत जास्त पाणीसाठा होईल, अशा जागा निश्चित कराव्यात. या अभियानाच्या माध्यमातून जमिनीची पाणी पातळी वाढविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तेथे जलयुक्त शिवार अभियानातून बंधारे बांधण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. त्याचप्रमाणे संबंधित विभागांनी या अभियानाच्या कामांचा एकत्रितपणे विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश भुसेनी दिले आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यावेळी म्हणाले की, शासनाच्या योजना राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांच्या उद्घाटनप्रसंगी देखील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण असलेली कामे तत्काळ पूर्ण करावीत. तसेच पूर्ण झालेल्या गावनिहाय कामांची सद्यस्थिती व वस्तुस्थितिदर्शक अहवाल संबंधित यंत्रणेने सादर करावा अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

बैठकीदरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जलयुक्त शिवार अभियानाबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गिते व जलजीवन मिशनबाबत जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com