एलॉन मस्क यांनी मंत्री पीयूष गोयल यांची मागितली माफी; काय आहे प्रकरण ?

एलॉन मस्क यांनी मंत्री पीयूष गोयल यांची मागितली माफी; काय आहे प्रकरण ?

कॅलिफोर्निया वृत्तसंस्था |California

अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) यांची संपूर्ण जगासमोर जाहीर माफी मागितली आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) अमेरिकेच्या (America) दौर्‍यावर आहेत. तेथे त्यांनी कॅलिफोर्नियातील (California) फ्रेमोंट (Fremont) येथील टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. पण पीयुष गोयल यांच्या दौर्‍यावेळी एलॉन मस्क त्यावेळी तिथे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी ट्विट करून याबाबत माफी मागितली आहे. भारत सरकार टेस्लाला आयात शुल्कात सवलत देण्याच्या विचारात असताना ही भेट झाली आहे.

एलॉन मस्क (Elon Musk) म्हणाले की, गोयल यांची फ्रेमोंट प्लांटला भेट देणे हा सन्मान आहे. याशिवाय भविष्यात त्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. एक्सवर गोयल (Piyush Goyal) यांच्या पोस्टला उत्तर देताना मस्कने लिहिले की, तुम्ही टेस्लाला भेट देणे हा सन्मान आहे. मी आज कॅलिफोर्नियाला भेट देऊ शकलो नाही याबद्दल दिलगीर आहे. परंतु मी भविष्यात भेटण्यास उत्सुक आहे.

पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट (Fremont) येथील टेस्लाच्या उत्पादन युनिटला (Tesla Production Unit) भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, टेस्ला कंपनी भारतातून आपल्या वाहन घटकांची आयात दुप्पट करेल. पीयुष गोयल यांनी यासंदर्भात ट्विट करत लिहिले की, टेस्लामध्ये प्रतिभावान भारतीय अभियंते आणि वित्त व्यावसायिकांना वरिष्ठ पदांवर काम करताना पाहून छान वाटले. मोटार वाहनांच्या क्षेत्रातील बदलामध्ये टेस्लाचे (Tesla) योगदान पाहून खूप आनंद झाला. यावेळी एलॉन मस्कच्या अनुपस्थितीबद्दल खेद व्यक्त करत त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची ही भेट अशा वेळी झाली आहे. जेव्हा भारत सरकार टेस्लाला भारतात सीमाशुल्क सवलत देण्याचा विचार करत आहे. मस्क यांनी ऑगस्ट 2021 मध्ये सांगितले होते की, जर टेस्ला भारतामध्ये वाहने आयात करण्यात यशस्वी ठरली तर ती भारतात उत्पादन युनिट स्थापन करू शकते. परंतु भारतातील आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com