दहावीत 100 टक्के गुणानंतरही अकरावी प्रवेश निश्चित नाही कारण...

दहावीत 100 टक्के गुणानंतरही अकरावी प्रवेश निश्चित नाही कारण...
अकरावी प्रवेश

मुंबई

दहावीच्या परीक्षेत (SSC Exam)अगदी १०० टक्के गुण मिळाले असले तरी विद्यार्थ्यांना सहज अकरावीसाठी प्रवेश मिळणार नाही. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना यंदा सीईटी ( CET ) परीक्षा द्यावी लागणार आहे. अकरावी प्रवेशात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत, त्यांनाच अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून सीईटीचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. सीईटीचे वेळापत्रक आणि अर्ज नोंदणी यासंबंधीची माहिती सोमवारी मिळणार आहे.

अकरावी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा (CET Exam) एसएससी बोर्ड (SSC Borad), सीबीएसई (CBSC), सीआयएससीई (CISCE) आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नाही. परंतु अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना CET मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.

तसेच दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना CET साठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार नाही. एसएससी बोर्ड वगळता इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र शुल्क भरावे लागणार आहे.

कशी असेल सीईटी (CET) परीक्षा?

CET परीक्षा SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असून १०० गुणांची परीक्षा असेल. OMR पद्धतीने परीक्षा होणार असून दोन तासांची परीक्षा असेल. इंग्रजी (English), गणित (Mathematics), विज्ञान (Science), सामाजिकशास्त्र (Sociology) या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा केंद्रांची यादी एसएससी बोर्ड किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.

अकरावी प्रवेशाचे निकष काय?

CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. CET परीक्षा देणाऱ्यांना ११ वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य असणार असून त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर CET न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता १० वीच्या पद्धतीनुसार होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com