Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअकरावी प्रवेशाबाबत शासन आदेशानुसार कळवणार

अकरावी प्रवेशाबाबत शासन आदेशानुसार कळवणार

नाशिक । प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही कार्यपद्धती अंतिम करण्यात आलेली नाही. तरीही काही कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचा संभ्रम निर्माण झाला असून आता हा संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभागानेच पावले उचलली आहेत. राज्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करू नये, अशा स्पष्ट सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

- Advertisement -

पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. तर उर्वरित राज्यात हे प्रवेश स्थानिक पातळीवरून केले जातात. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणपणे अकरावीचे प्रवेश सुरू होतात. मात्र, यंदा दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे.

तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार असल्याने राज्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. प्रवेशासाठी गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यास सुरुवात केली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाला त्वरित ही प्रवेश प्रक्रिया बंद करण्यासंदर्भात सूचना द्यावा लागल्या.

प्रवेशाबाबत कळवू

शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर शासन आदेश आल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. मात्र, तत्पूर्वी कोणत्याही महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू येऊ नये. विद्यार्थी, पालकांची दिशाभूल होईल, अशा कोणत्याही सूचना देऊ नयेत.

दत्तात्रेय जगताप, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय.

- Advertisment -

ताज्या बातम्या