राज्यात आजपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

सामाजिक आणि आर्थिकदृष्टया मागास प्रवर्ग अर्थात एसईबीसी आरक्षणाचा तिढा न्यायालयात प्रलंबित असल्याने शालेय शिक्षण विभागाने या आरक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्याना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.

सप्टेंबरपासून स्थगित ठेवलेल्या प्रवेशांना आज, गुरुवारपासून सुरुवात होणार असून ५ डिसेंबरला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अकरावीचे प्रवेश रखडले होते. अखेर यावर सरकारने तोडगा काढत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात दिली. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. ९ सप्टेंबरपासून प्रवेेश स्थगित ठेवण्यात आले आहेत. निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी याबाबतचा निर्णय सरकार घेत नव्हते. यामुळे सर्व स्तरावरून टीका होत होती.

यातच मंगळवारी उच्च न्यायालयातही याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने सरकारला बुधवारी आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर काल शासन निर्णय प्रसिद्ध केला.

शासन निर्णयानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये ९ सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत त्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *