Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशासकीय नियमांचे पालन करूनच निवडणूका पार पाडाव्यात

शासकीय नियमांचे पालन करूनच निवडणूका पार पाडाव्यात

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

करोनाच्या दुसर्‍या प्रकारच्या विषाणुचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे मत काही देशांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनाने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करुनच विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व अधिकार्‍यांना दिल्या.

- Advertisement -

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांची ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात ‘झुम अ‍ॅप’द्वारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी गमे म्हणाले, निवडणूक आयोगाने ग्रामपंचायती निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर केला आहे. यामध्ये नाशिक विभागात एकूण 2 हजार 476 ग्रामंपचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात 621, अहमदनगर 767, जळगांव 783, धुळे 218 तर नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.

यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना करण्यात याव्यात अशी सूचना त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावी. यासाठी प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी हेल्प डेस्कची निर्मिती करुन त्याठिकाणी ऑनलाइन पध्दतीने उमेदवाराचे नामनिर्देशन व घोषणापत्र भरुन घ्यावे. तसेच याबाबत कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात यावे.

प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी इव्हीएम मशिन निवडणुकीपुर्वी व मतमोजणी नंतर जिथे ठेवण्यात येतील त्या ठिकाणाची पाहणी करावी. निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे देण्यात आलेल्या भागामध्ये सहा वेळा पाहणी करून परिपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाला पाठविणे आवश्यक असल्याचे, विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.

निवडणूक निरीक्षकांनी मतदान प्रक्रियेत नेमलेले अधिकारी व कर्मचार्‍यांना योग्यप्रकारे प्रशिक्षण द्यावे. तसेच प्रशिक्षणात अधिकारी व कर्मचार्‍यांची गैरहजर असतील किंवा कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. आचारसंहितेचे उल्लंघन होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात याव्यात, असे निर्देश गमे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

निवडणूक निरीक्षकांनी आयोगाने ठरवून दिलेल्या नियमावलीतच काम करणे आवश्यक असून, कुठेही नियमांचे उल्लंघन होवू नये. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक पध्दतीने पार पडावी यासासाठी प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी पूर्वतयारी करावी, अशा सूचना गमे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळेचे जिल्हाधिकारी संजय यादव, जळगांवचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड व प्रत्येक जिल्ह्यातील प्रांत अधिकारी व तहसिलदार झुमद्वारे बैठकीस उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त अर्जुन चिखले (महसूल), उपायुक्त (सामान्य) अरुण आनंदकर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या