काँग्रेस अध्यक्षपदाची आज निवडणूक

मल्लिकार्जुन खरगे-शशी थरूर यांच्यात सरळ लढत
काँग्रेस अध्यक्षपदाची आज निवडणूक

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज (दि.17) निवडणूक (Election for Congress President)होत आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठनेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात सरळ लढत होत आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत देशातील विविध ठिकाणी मतदान होणार आहे. 137 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसला 24 वर्षांनंतर गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. मतदानानंतर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निवडणूक निकाल लागणार आहे.

उद्या होणार्‍या निवडणुकीत काँग्रेस समितीचे 9, 000 पेक्षा जास्त सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. खरगे आणि थरूर यांच्या लढतीत खरगे यांच्या नावाला पसंती मिळत असल्याचे बोलले जात आहे. याउलट काँग्रेसमध्ये बदल घडवण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे थरूर यांनी सांगितले. असे असले तरी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे येणार यांची उत्सुकता काँग्रेसजनांना लागली आहे.

शनिवारी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यासह त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. मतदान प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली. थरूर यांच्या प्रतिनिधीने मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यावर प्राधिकरणात त्यात तत्काळ बदल केला. त्या बदलाला दोन्ही उमेदवारांनी सहमती दर्शवली आहे.

सदस्यांना मतदान करताना पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे 1 हा आकडा टाकायचा आणि मतपत्रिकेची घडी घालून ती मतपत्रिकेत टाकायची, असे निवडणूक प्राधिकरणाकडून आधी सांगण्यात आले होते. मात्र थरूर यांच्या प्रतिनिधींनी त्यावर आक्षेप घेतला. खरगे यांचा मतपत्रिकेवरील क्रमांक एक असल्यामुळे मतदान करताना सदस्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या आक्षेपाची निवडणूक प्राधिकरणाने तत्काळ दखल घेतली असून मतदान प्रक्रियेत आज बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता सदस्यांना मतदान करताना पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे एफ या अक्षरावर टिक मार्क करावा लागणार आहे.हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस महासचिव, प्रभारी, सचिव, संयुक्त सचिवांसह सकाळी 24, अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयात मतदान करतील. तसेच राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

36 मतदान केंद्रे, 67 बूथ

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत 36 मतदान केंद्रे तर 67 बुथ असतील. त्यापैकी 6 बूथ उत्तर प्रदेशात आहेत. 200 मतांसाठी एक बूथ तयार करण्यात आला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत सामील असलेल्या राहुल गांधी यांच्यासह 47 सदस्य कर्नाटकातील बेल्लारीत मतदान करतील. येथील शिबिराच्या ठिकाणी स्वतंत्र मतदान व्यवस्था करण्यात येणार आहे.

सल्ला घेण्यात लाज नाही

काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर पक्षाचे कामकाज चालवताना गांधी घराण्याचा सल्ला आणि पाठिंबा घेण्यास आपल्याला लाज वाटणार नाही. कारण गांधी घराण्याने पक्षासाठी संघर्ष केला आहे. पक्षाच्या वाढीसाठी आपली ताकद पणाला लावली आहे.

- मल्लिकार्जुन खरगे

देशाला मजबूत काँग्रेस हवी

देशाला मजबूत काँग्रेस हवी आहे. पक्षात सतत चढउतार होत आहेत. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. आता काँग्रेसचे अस्तित्व वाचवायचे आहे. त्यासाठी काँग्रेसला बळकट करावे लागेल. हे काम एक कणखर अध्यक्षच करू शकतो.

- शशी थरूर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com