आता वाट पाहू नका, थेट...; एकनाथ खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला

आता वाट पाहू नका, थेट...; एकनाथ खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात शिंदे गट (Shinde Group) व भाजपच्या (BJP) प्रत्येकी आमदारांनी शपथ घेतली. यानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र, यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पुढील मंत्रिमंडळ विस्तारात तरी स्थान मिळणार का, यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी भाजपवर टीका करताना पंकजा मुंडेंना एक सल्ला दिला आहे....

यावेळी खडसे म्हणाले की, मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet expansion) अपूर्ण दिसत आहे. पुढील काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. पण अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचे दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं, असे ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार सचिन आहिर (MLA Sachin Ahir) यांनी पंकजा मुंडेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारसा चालवत आहेत. असे असताना देखील त्यांना मंत्रिपदाबाबत सातत्याने डावलले जात आहे. त्यांना मंत्रिपद मिळावे ही सर्वांचीच इच्छा असते पण शेवटी भाजप पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना सूचक प्रतिक्रिया देत म्हटले होते की, मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रीमंडळ बनवायचं असतं, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसतं. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं. तसेच मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. कदाचित अजून पात्रतेचे लोक असतील. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com