खडसे म्हणतात, अजून भाजपात, योग्य वेळी निर्णय घेणार

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा
घटस्थापनेला होणारा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त हुकल्यानंतर आता त्यांच्या पक्ष प्रवेशाची नवी तारीख समोर आली आहे.

एकनाथ खडसे हे येत्या 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार,अशी चर्चा माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात केली जात आहे. मात्र आपण भाजपचा राजीनामा दिला नसून, पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे.

भाजपात नाराज असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपला सोडचिट्ठी देवून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवस सुरू आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावाही करण्यात येत होता. मात्र १७ ऑक्टोबरचा मुहूर्त हुकल्यानंतर आता येत्या २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते स्थानिक पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,येत्या गुरूवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा असून भाजपला एकाचवेळी दोन धक्के मिळण्याचीही शक्यता आहे. यासह खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष होते. परंतु रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार असल्याचे समजते.
दरम्यान खडसे यांच्याशी संपर्क साधला असता,आपण अजून भाजपचा राजीनामा दिलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पुढील राजकीय वाटचालीबाबत योग्यवेळी ठोस निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *