Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यात्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकासासाठी केंद्र,राज्य सरकारचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावा - महामंत्री हरीगिरी...

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकासासाठी केंद्र,राज्य सरकारचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावा – महामंत्री हरीगिरी महाराज

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

केंद्र आणि राज्य सरकारकडून (Central and State Government) त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) कुंभमेळ्यासाठी मोठा विकास निधी मिळवण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुंभमेळा पूर्वतयारी बैठकीत आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज (Harigiri Maharaj) यांनी केले.

- Advertisement -

आगामी २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा (Kumbh Mela) भरणार आहे. या कुंभमेळ्यासाठी भाविकांना (Devotees) कोणत्या सुविधा देणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने शासनाला प्रस्ताव देण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा पूर्वतयारीची बैठक त्र्यंबक नगरपरिषदेकडून घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन नगरपरिषद प्रशासक तसा मुख्याधिकारी श्रीया देवचके यांनी केले होते. तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज होते.

यावेळी हरीगिरीजी महाराज यांनी जेथे अमृत पडले त्या त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक रूपाने सामील होणे हे पुण्याचे काम आहे असे म्हटले. तर त्र्यंबक नगरपरिषद आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या कामात शिस्त गती नसल्याचा आरोप श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज (Sivagiriji Maharaj) यांनी केला. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त म्हणून नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून साधूंची वेळ येवू पाहात आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच आखाडा परिषदेचे सचिव शंकरानंद सरस्वती महाराज यांनी त्र्यंबकेश्वर मधील वाहनतळ मंदिर चौक या भागातील परिस्थिती पाहता रस्त्याने चालता येत नसल्याचा आरोप केला. तसेच शहरात अस्वच्छता असल्याचे सांगत त्र्यंबक नगरपरिषदेच्या मोकळ्या जागा कुठे गेल्या आहेत अशी विचारणा करत भाविकांना कुंभमेळा पर्वणी पाहण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय त्र्यंबक नगरपरिषद यात्रेकरूंच्या प्रती उदासीन असल्याचे म्हणत ज्या जागांचा करार संपला आहे त्या जागांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याचे शंकरानंद सरस्वती महाराज म्हणाले.

तर नीलपर्वत पायथा येथील आवाहन आखाड्याच्या धर्मध्वजाची जागा मोकळी नसल्याबद्दल आनंदपुरी महाराज यांनी आवाज उठविला. नगरपरिषद अवास्तव टॅक्स घेते असा आरोप अग्नी आखाड्याचे दुर्गानंद ब्रम्हचारी यांनी केला. तसेच मागील कुंभमेळ्यात हरीगिरीजी महाराज यांचा माध्यमातून अमित शहा, राजनाथ सिंह हे केंद्रीय मंत्री त्र्यंबकेश्वरला आले होते. आता त्यांनी साथ दिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील त्र्यंबकेश्वरला येऊ शकतात असा दावा काही साधूंनी बोलतांना व्यक्त केला.

दरम्यान, या बैठकीचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांनी केले. तर राजेश दीक्षित, विक्रम जोशी, यांच्यासह इतर मान्यवरांनी विचार मांडत कुंभमेळा कायदा त्र्यंबकेश्वरला लागू करावा अशी मागणी केली. या बैठकीत त्र्यंबकेश्वरमधील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष सामील झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने सर्व आखाड्यांचे साधू महंत उपस्थित होते. तसेच खासदार आमदारांच्या उपस्थितीत लवकरच पुढील बैठक होणार असून त्या बैठकीस पालकमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या