'विशेष मिशन इंद्रधनुष 5.0' लसीकरण मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी करा - डॉ.अशोक करंजकर

तीन टप्प्यात होणार लसीकरण
'विशेष मिशन इंद्रधनुष 5.0' लसीकरण मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी करा -  डॉ.अशोक करंजकर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बालकांमधील आजारपण कमी करण्यासाठी मनपाच्या सर्वेक्षणात अर्धवट लसीकरण झालेले, लसीकरण न झालेली बालके मोंठ्या प्रमाणात आढळून आलेली आहेत. त्याच्यासाठी नाशिक महानगर पालिका क्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील बालकांचे माहे ऑगस्ट 2023 पासून तीन फेर्‍यांमध्ये 'विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 लसीकरण मोहीम' राबविण्यात येणार आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी शहरातील सर्व पात्र लाभार्थी यांनी या मोहीम कालावधीमध्ये अर्धवट राहिलेले लसीकरण पूर्ण करुन घेण्याच्या सूचना दिल्या.

गरोदर माता व बालके लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व आरोग्य संस्थांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. लसीकरण सत्राचे नियोजन शहरी भागात केले जाईल. सर्व सत्रे यु-विन या पोर्टलवर तयार करण्यात येणार आहेत. ही मोहीम तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. पहिला टप्पा दि 7 ते 12 ऑगस्ट, दुसरा टप्पा दि.11 ते 16 सप्टेंबर व तिसरा टप्पा दि.9 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येणार आहे.

आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, नर्सिंग स्टाफ यांच्यामार्फत घरोघरी जावून सर्व्हे करण्यात आला आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी मोहिमेबाबत सभागृहास माहिती दिली. तसेच मनपाच्या माता व बालसंगोपन अधिकारी तथा सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी या मोहिमेमध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेले व अर्धवट लसीकरण झालेले गरोदर माता व 0 ते 5 वर्षे वयापर्यंतच्या बालकांचा शोध घेवून त्यांना लसीकरण करावयाचे असल्याचे बैंठकीत सांगितले.

मिशन इंद्रधनुष 5.0 यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते सहकार्य करावे, लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येऊन मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी असे निर्देश मनपा आयुक्त करंजकर यांनी दिले.

या बैठकीस नाशिक महानगरपालिकेचे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नितीन रावते, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, डॉ. प्रशांत शेटे, कल्पना कुटे, शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील जागतिक आरोग्य संघटनेचे नाशिकचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश नांदापूरकर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. शैलेश लोंढे, आयसीडीएसचे प्रकल्प अधिकारी आयएमएचे डॉ. जगताप, मनपाचे वैद्यकीय विभागाचे सर्व रुग्णालयाचे अधीक्षक, नोडल अधिकारी, युनिसेफचे डॉ. सुमेध कुदळे, सार्वजनिक विभागाच्या परिचारिका दराडे व कुलकर्णी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com