शिक्षकांच्या वाढीव अनुदानाबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिले 'हे' आश्वासन

आंदोलन मागे घेण्याचे शिक्षकांना आवाहन
शिक्षकांच्या वाढीव अनुदानाबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिले 'हे' आश्वासन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

घोषित शाळांतील शिक्षकांच्या ( Teachers ) वाढीव टप्पा अनुदानाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि मुख्यमंत्री येत्या १५ नोव्हेंबरला याबाबतचा निर्णय जाहीर करून वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडवतील, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिले. या आश्वासनानंतर केसरकर यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

वेतन अनुदानाचे सूत्र पूर्वीप्रमाणे लागू करावे या मागणीसाठी शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षकांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत केसरकर यांनी आज मंत्रालयात संबंधित शिक्षक प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत या विषयाशी संबंधित आतापर्यंत जारी झालेल्या शासन निर्णयांची सविस्तर माहिती घेऊन घोषित शाळांच्या टप्पा वाढीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, उपसचिव समीर सावंत, शिक्षक समन्वय समितीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

शिक्षक हे उद्याची पिढी घडविणारे असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समस्यांबाबत न्याय देण्याची भूमिका घेतली असून शासन सहानुभूतीने विचार करीत आहे. अनुदानाच्या विविध टप्प्यांवरील पात्र शिक्षकांची संख्या, त्यासाठी येणारा खर्च याबाबत सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्री येत्या १५ तारखेला याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com