
दिल्ली | Delhi
तुर्की आणि सीरियात गेल्या आठवड्यात आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता आज पहाटे सिक्कीम मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या धक्यांची तीव्रता ४.३ एवढी मोजली आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सिक्कीमच्या उत्तरेला ७० किमी अंतरावर असलेल्या युकसोम येथे पहाटे ४.१५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश २७.८१ आणि रेखांश ८७.७१ होता. भूकंपाची खोली १० किमी इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपात सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
दरम्यान तुर्की आणि सीरिया या देशांमध्ये ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर जखमींची संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे. सध्या ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जावेद मलिक यांनी दावा केला आहे की, भारतातही तुर्कीप्रमाणेच मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून लखनऊपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. येत्या काही दिवसांत भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी याबाबत संशोधन केले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय किंवा अंदमान निकोबार किंवा कच्छ असू शकतो असा त्यांचा दावा आहे.