कांदा अनुदानासाठी बोगस लाभार्थी तयार होतायेत

बनावट पावत्या बनवणार्‍यांचा सुळसुळाट; शेतकर्‍याच्या तक्रारी
कांदा अनुदानासाठी बोगस लाभार्थी तयार होतायेत

नाशिक । विजय गिते

राज्यात यावर्षी कांद्याचे मोठ्या प्रमाणात खरीप, रब्बी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे अपेक्षित भाव कांद्याला मिळाला नाही. परिणामी शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत शेतकरी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर सरकारने सन 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले. मात्र, हे अनुदान प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या पदरी पडणार की यामध्ये बनावट पावत्या करणार्‍याच्या हातात पडणार अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे कष्ट करणारे वेगळे आणि मलई खाणारे वेगळेच, अशी अवस्था दिसून येत आहे.

शासनाने 350 रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र, ही बाब शेतकर्‍यांच्या कमी आणि व्यापारी वर्गाच्याच पथ्यावर अधिक पडली असल्याचे चित्र आहे.अनुदान साडेतीनशे रुपये घोषित तर झाले.पण व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचा माल लिलावात 400 ते 500 रुपये अशा अल्पदराने घेत 'कार्यक्रम' केल्याच्या भावना व्यक्त होत आहे.

मुळात बाजार समित्या मार्चअखेरीस दोन -चार दिवस चालू ठेवणे हे शेतकरी हिताचे कमी आणि व्यापारी हिताचेच जास्त राहिले. याचा परिणाम असा झाला की खरा लाभार्थी शेतकरी अवघे दोन टक्के आणि संपूर्ण जिल्ह्यात एक एक व्यापारी वर्गाने आपले नातेवाईक,संबंधित यांचे सातबारा गोळा करून 4,5 हजार क्विंटलचे अनुदानाचे दस्तऐवज तयार करून घेतले आहेत, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. विशेष म्हणजे काही बाजार समित्यामध्ये तर सहा महिन्यात झाली नाही,एवढी आवक शेवटच्या पाच-सहा दिवसात झाली,असे दाखविले गेले.

यामध्ये खरा हक्कदार शेतकरी राजादोनशे क्विंटल पुरताच मर्यादित राहिला आणि अनुदानाची मलई खाण्याच्या इराद्याने गैरफायदा घेतला हे मात्र नक्की.याबाबत आता शेतकरी वर्गाकडून तक्रारी होऊ लागल्या आहेत.

विठेवाडीच्या शेतकर्‍याचे उपोषण

जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदीदार व्यापारी यांनी कांदा अनुदान लाटण्यासाठी टक्केवारी नुसार बनावट नोंद (पावत्या) केलेल्या आहेत, अशी तक्रार करत याची सखोल चौकशी करून संबंधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर व व्यापारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी विठेवाडी ता. देवळा येथील सुनिल दादाजी सोनवणे या कांदा उत्पादक शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे उपोषण सुरू केले आहे.

खरोखर विक्री झाली का?

अशाप्रकारे बनावट पावत्या झाल्या आहेत का? यासाठी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांची चौकशी झाली पाहिजे. ठिकठिकाणी मापारी वर्गाने बनावट पावत्या बनविण्याचा अक्षरशः बाजार मांडलेला होता. दि.13 मार्चच्या पुढील विक्रीची चौकशी ही झालीच पाहिजे. जेणेकरून खर्‍या बाधित बळीराजालाच याचा फायदा व्हायला हवा. ज्यांनी चोरी केली त्यांना होऊ नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com