मराठी नेत्यांमुळे बिहारचे रणांगण तापणार

नाशिक । कुंदन राजपूत Nashik

दिवाळीच्या अगोदर बिहार निवडणुकीचा निकाल लागणार असला तरी प्रचारात फटाके, फुलबाज्या महाराष्ट्राचे नेते उडवणार आहेत.

राज्याचे विरोधी पक्ष नेते फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर, समता परिषदेचे छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिवसेनेने देखील बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे आता बिहारच्या दंगलमध्ये मराठी धुराळा उडताना पहायला मिळू शकतो. मराठी नेत्यांमुळे बिहारचे रणांगण तापण्यास सुरुवात झाली आहे.

बिहार निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. निवडणुकीत यंदा मराठी नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्रासाठी ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बिहारमध्ये निवडणूक प्रभारी केले आहे. फडणवीस त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषदेने राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह यांच्या भुजात बळ भरले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे देखील मैदानात उतरले आहेत.

बाहुबली पप्पू यादव यांच्या प्रोगेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्समध्ये ते निवडणुकिला सामोरे जात आहे. आता निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असताना शिवसेनेने देखील बिहारमध्ये स्वबळाची तुतारी फुंकली आहे. या ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना 30 ते 40 जागांवर उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे फायरब्रॅण्ड नेते संजय राऊत व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या ठिकाणी प्रचार सभा घेऊ शकतात असे बोलले जात आहे.

त्यामुळे बिहार निवडणूक प्रचारात फडणवीस, भुजबळ, अ‍ॅड.आंबेडकर यांसह आता सेना नेत्यांच्या मुलूख मैदान तोफा जोरदार धडाडण्याची शक्यता आहे. सोबतीला बंंपर पॅक म्हणजे भाजपसाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या चारोळ्या देखील बिहारी जनतेचे नक्कीच मनोरंजन करतील. एकूणच भोजपुरी तडक्यात मराठी नेते कोणते रंग भरतात याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *