प्रतिनिधी नाशिक

समृद्धी महामार्गाच्या कामात कुठे वेग तर कुठे संथगती आहे. इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी काम शेतकऱ्यांनी रोखून धरले आहे. मोबदलाचा प्रश्न कायम असतांना सर्व्हे करताना अनेक त्रुटी राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महामार्गावर असलेली बीपीसीएलची पेट्रोल पाईपलाईन अद्याप वळवलेली नसल्याने देवळे शिवरातील कामही थांबले आहे.

इगतपुरी तालुक्यातील अवचितवाडीत कारभारी लक्ष्मण दुभासे (गट नंबर १२२) यांनी त्यांच्या शेतातून होणारे काम रोखले आहे. त्यांच्या शेताच्या एका बाजूला महामार्गाच्या भरावाचे काम पुर्ण झाले आहे तर दुसऱ्या बाजूला पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु त्यांचा शेतात खडी ठेवल्याशिवाय काहीच काम झालेले नाही. शेतात होणारे काम का रोखून धरले? यावर कारभारी म्हणतात, ‘मला जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही. शेतात असणाऱ्या झाडांची गणना झाली नाही. पाईपलाईनही ग्राह्य धरली नाही. महामार्गामुळे शेताचे दोन तुकडे झाले आहेत. दुसरा तुकडा अर्ध्या एकरपेक्षाही कमी आहे. यामुळे त्याचा काहीही फायदा होणार नाही. अर्ध्या एकरपेक्षा कमी जमीन असल्यास शासनानेच ती ताब्यात घ्यावी, असा नियम आहे. परंतु त्यांचे पालन झाले नाही. यामुळे या सर्व मागण्यांची पुर्तता झाल्याशिवाय आपण शेतात काम होऊ देणार नाही.’

तालुक्यात माणसी २ गुंठेच जागा

इगतपुरी तालुक्यात विविध विकासाकामांसाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात आहे. यामुळे तालुक्यात माणसी २ गुंठे अशीच जमीन शिल्लक राहिली आहे. भविष्यात त्यापेक्षा विदारक परिस्थिती होऊन शेतकरीच शिल्लक राहणार नाही, असा आरोप कांचनगाव येथील शेतकरी लक्ष्मण रामचंद्र गवाणे यांनी केला. गवाणे म्हणातात, २०१५ पासून आपण शासनाशी पत्रव्यवहार करत आहोत. परंतु त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही. धाक दाखवून जमीन ताब्यात घेतल्या गेल्या आहेत. जे शेतकरी भूमहिन झाले त्यांचा काहीच विचार केला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या दोन, चार गुंठेच जमीन शिल्लक आहे, त्याबाबत काहीच विचार नाही. पर्यावरणासंदर्भात कोणताही नियम पाळला नाही.

एक प्रोजेक्ट एक रेट नाही

इगतपुरी तालुक्यात एक प्रोजेक्ट एक रेट दिला गेला नाही. मोजक्या शेतकऱ्यांना वेगळी किंमत तर अन्य शेतकऱ्यांना अल्प किंमत दिली गेली आहे. देवळे येथील शेतकरी निवृत्ती महादू तुपे यांनी दिवाळीपासून शेतातील काम थांबवले आहे. तुपे म्हणतात,‘दडपशाही पद्धतीने आमची जमीन ताब्यात घेतली आहे. आमच्या शेतात देवस्थान आहे. त्याचाही विचार केला गेला नाही. पाच वर्षांपासून आमचा संघर्ष सुरु आहे. परंतु आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.’

पेट्रोलियम पाईपलाईनचा अडसर

देवळा गावातून बीपीसीएलचे पेट्रोलियम पाईपलाईन गेली आहे. देवळा शिवरातील सुमारे तीन-चार किमी पाईपलाईनवरुनच समृद्धी महामार्ग जात आहे. यामुळे ही पाईपलाईन दुसरीकडे वर्ग करावी लागणार आहे. परंतु अजूनही त्याचे काम सुरु झालेले नाही. यामुळे या ठिकाणीही महामार्गाचे काम थांबले आहे. तसेच देवळा परिसरात डोंगर असल्यामुळे सुरुंगाचे काम सुरु आहे. हे सुरुंग फोडण्यासाठी होत असलेल्या दारुगोळ्याच्या वापरामुळे परिसरातील घरांना तडे जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

गौण खनिजासाठी डोंगराचा वापर

इगतपुरी तालुक्यातील तातेवाडीत मोठे डोंगर आहे. परंतु येत्या वर्षभरात या ठिकाणी डोंगर होते? अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी लागणाऱ्या या डोंगराच्या गौण खनिजचा बेमसुमार उपसा होत आहे. अनेक पर्यावरण प्रेमी त्यास विरोध करत आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नाही.

भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. या जमिनी ताब्यात घेतांना दडपशाही पद्धतच अवलंबली गेली. जे शेतकरी लवादाकडे गेले त्याचा विचार केला गेला नाही. लवादाकडे शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. यामुळे जमिनीचा मालक असणारा शेतकरी आज रस्त्यावर आला आहे.
संतोष कचरु भोसले, धामनी, ता.इगतपुरी

आम्ही शेतात उसाची लागवड केली होती. ठेकेदाराने या उसाची नासधूस केली. शेतात असलेले घरही पाडले. त्यांचीही भरपाई मिळाली नाही. तसेच जमीनाचा मोबदला योग्य मिळाला नाही. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत.
अरुण गायकर, खेरगाव, ता.इगतपुरी