आता १०० रुपयांतच होणार कोरोना चाचणी

आता १०० रुपयांतच होणार कोरोना चाचणी

मुंबई

मुंबईत नवीन रॅपिड अँटिजेन टेस्ट किट तयार करण्यात आले आहे. हे किट स्टार्टअप कंपनी पतंजली फार्माने तयार केले आहे. पतंजली फार्माने तयार केलेलं हे किट गोल्ड स्टँडर्ड आरटीपीसीआर टेस्ट किट आणि सध्या असलेल्या रॅपीड अँटिजेन टेस्टसारखेच असणार आहे. त्यात अवघ्या 100 रुपयांमध्ये कोरोना चाचणी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे चाचणी केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांत त्याचा अहवाल मिळणार आहे.

स्टार्टअप पतंजली फार्माने विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटीच्या सहकार्याने सर्वसामान्यांना परवडणारे कोरोना चाचणी किट तयार केले आहे. याद्वारे जून महिन्यात हे किट वापरात येऊ शकते, अशी अपेक्षा पतंजली फार्माकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. हे किट तयार करण्यासाठी पतंजली फार्माला केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 75 लाखांचे अर्थसहाय्य केले आहे. तसेच आणखी 75 लाखांचे कर्जही दिले आहे. मुंबईतील या स्टार्टअपने तयार केलेलं टेस्ट किट हे खूपच स्वस्त आहे. यासाठी आयआयटी मुंबईचीसुद्धा मदत झाली आहे.

पतंजली फार्माचे डॉ. विनय सैनी यांनी सांगितले की, गेल्या 8-9 महिन्यांमध्ये संशोधन करून हे किट तयार केले आहे. ते कोव्हिड केंद्रांना पुरवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. हे किट तयार करताना मुंबईतील अनेकांचे स्वॅब घेण्यात आले.

विनय सैनी यांनी कोरोना तपासणी किट तयार करण्याबाबत सांगितले की, कोरोना रुग्ण आणि व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियनच्या नमुन्यांमध्ये आमच्या उत्पादनांची अंतर्गत पडताळणी करणं हा एक वेगळा आणि अद्भुत अनुभव होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या स्वॅबचा समावेश होता. यावेळी मुंबईतील वेगवेगळ्या कोरोना केंद्रांवर चाचणीवेळी कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com