
मुंबई | Mumbai
ड्रग्ज माफिया (Drug Mafia) आणि पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई साकीनाका पोलिसांनी (Mumbai Sakinaka Police) तामिळनाडू येथून अटक (Arrested) केली होती. त्यानंतर आज ललित पाटीलला अंधेरी सेशन्स कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची म्हणजेच सोमवार (दि. २३ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे...
यावेळी कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले की, " ललित पाटीलने म्हटले की पुणे पोलिसांकडून (Pune Police) माझ्या जीवाला धोका आहे. तर ललित पाटीलच्या वकिलांनी त्याला न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) पाठवावे अशी विनंती केली. मात्र, त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, हे ड्रग रॅकेट खूप मोठे आहे. यामध्ये १२ आरोपी आहे. पोलिसांनी ज्या बाराव्या आरोपीला अटक केली त्यावेळी त्याने सांगितले की, तो कच्चा माल ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलला पुरवायचा आणि त्यानंतर ललित पाटील तो घ्यायचा. हे संपूर्ण ड्रग रॅकेट ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) ऑपरेट केले जात होते. यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, कोर्टात हजर करण्याआधी ललित पाटीलने माध्यमांसमोर "ससूनमधून मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं" असा दावा केला आहे. तसेच यात कुणाचा हात आहे, हे सर्व सांगेन असा इशाराही ललित पाटीलने दिला आहे. त्यामुळे आता ललित पाटील करत असलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर ललितला पळवण्यात नेमका काय उद्देश होता, कोणाची नावे तपासात लपवली जात आहेत का? असेही प्रश्न ललितच्या दाव्यामुळे उपस्थित होत आहेत.