गट, गण प्रारुप आराखडा प्रसिध्द

गट, गण प्रारुप आराखडा प्रसिध्द

8 जूनपर्यंत मागविल्या हरकती, सूचना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या 84 गट ( Zilla Parishad Gat ) आणि 15 पंचायत समित्यांच्या 168 गणांच्या ( Panchayat Samiti Gan )प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा (Draft plan of ward structure) अखेर झाला आहे.गत सहा महिन्यांपासून सर्वांनाच याची प्रतिक्षा लागून होती.

जिल्ह्यात यावेळी 11 गट व 22 गणांची अधिकची भर पडली आहे.11 तालुक्यांमधील पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या गटांमध्ये मोठे फेरफार होऊन नव्याने गट तयार झाले आहेत. यामुळे अनेक दिग्गजांच्या गटांची तोडफड झाल्याने त्यांची चांगलीच पंचाइत झाली आहे.गुरुवारी (दि.2)जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 8 जून 2022 पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत.

फेब्रुवारी 2022 मध्ये राज्य निवडणुक आयोगाने राबवलेला गट-गण प्रारुप आराखडा कार्यक्रम रद्द करत, जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारुप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. यात आता गट-गणांचे प्रारुप आराखडे मान्यतेचे अधिकारी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. जिल्हाधिकाजयांनी गुरूवारी हा प्रारूप आराखडा प्रसिध्द केला. जिल्हाधिकारी

कार्यालयासह, तालुकास्तरावर तहसिल कचेरी, जिल्हा परिषद आदी ठिकाणी हा आराखडा लावण्यात आला आहे. प्रसिध्द झालेल्या प्रारूप आराखडयातील गट व गणांच्या सीमारेषांमध्ये मोठे बदल झाले आहे. गटांची संख्या 73 गटांवरून 84 झाल्याने 11 गट नव्याने वाढले आहेत. देवळा, नांदगाव, येवला व इगतपुरी या चार तालुक्यात एकही गट वाढला नसल्याने येथील गट व गण रचना जैसे थे आहे.

हे आहेत नव्याने तयार झालेले गट

* बागलाण तालुक्यात 7 गट होते. यात एक गट वाढला असून आता 8 गट तयार झाले आहेत. पठावे दिगर हा गट रद्द होऊन डांगसौदाणे व मुल्हेर हे नवीन गट तयार झाले आहेत.

* मालेगाव तालुक्यात 7 गट होते, यात दोन गट वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यात 9 गट तयार झाले आहेत. यात वडनेर गट रद्द झाला असून नव्याने अस्ताणे, वडेल, टाकळी हे गट तयार झाले आहेत.

* कळवण तालुक्यात 4 गट होते. यात एकाची वाढ झाली असून आता 5 गट तयार झाले आहेत. खर्डे दिगर गट रद्द झाला असून पुनद नगर व दळवट हे नवीन गट तयार झाले आहेत.

* सुरगाण्यात पूर्वी तीन गट होते, यात एकाची वाढ होऊन चार गट तयार झाले आहेत. हट्टी गट रद्द होऊन भदर व बोरगाव हे नवीन गट अस्तित्वात आले आहेत.

* पेठमध्ये पूर्वी दोन गट होते, यात एक गट वाढला आहे. धोंडमाळ गट रद्द होऊन सुरगाणे व कुंभाळे हे नवीन गट अस्तित्वात आले आहेत.

* दिंडोरी तालुक्यात पूर्वी 5 गट होते. यात एकाची वाढ झाली असून वरखेडा हा नवीन गट तयार झाला आहे.

*चांदवड तालुक्यात पूर्वी 4 गटात एकाची वाढ होऊन धोंडाबे हा नवीन गट तयार झाला आहे.

* निफाड तालुक्यात पूर्वी 10 गट होते.त्यातील ओझर गट रद्द झाल्याने 10 गटांची पुनर्रचना झाली असून नव्याने पिंपळस गट तयार झाला आहे.

* नाशिक तालुक्यात एक गट वाढला असून आता 5 गट तयार झाले आहेत. पिंप्री सय्यद नवीन गट तयार झाला आहे.

* त्र्यंबकेश्वर तालुक्यात पूर्वी तीन गट होते. यात एक गट वाढला आहे. ठाणापाडा गट रद्द होऊन बेरवळ व वाघेरा गट तयार झाला आहे.

* सिन्नर तालुक्यात पूर्वी 6 गट होते. यात एक गटाची वाढ झाली आहे. नायंगाव, देवपूर, चास व ठाणगाव या गटाची पुनर्रचना झाली असून नव्याने माळेगाव, सोमठाणे, पांगरी बु, दापूर, शिवडे हे गट तयार झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com