
मुंबई | Mumbai
नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरातांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर आज बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे...
यानंतर आता आमदार बाळासाहेब थोरातांच्या राजीनामा प्रकरणावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) माजी आमदार आणि थोरातांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबेंनी (Dr.Sudhir Tambe) यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, थोरात यांनी राजीनामा (Resignation) दिला हे मला माध्यमांतून आलेल्या बातम्यांमधून समजत आहे. त्यामुळे ही व्यथित होणारी गोष्ट आहे. बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेसच्या (Congress) विचारांवर त्यांची निष्ठा आहे. माझी त्यांची चर्चा झालेली नाही, मात्र त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ का आली? यावर विचार व्हायला हवा. असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, जेव्हा एखादी व्यक्ती पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली आहे. पक्षासाठी समर्पित भावनेने काम करत असताना त्यांना विश्वासात न घेणे किंवा एखाद्या निर्णयात सहभागी करुन न घेणं, हे योग्य नाही. ते विधीमंडळ पक्षनेते आहेत, त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी होती, असे मला वाटते. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात ज्यांनी नेतृत्व केलं. काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमात झोकून देऊन काम केले. याबाबत पक्षश्रेष्ठींनी गंभीर होऊन विचार केला पाहीजे, असे देखील डॉ. तांबेंनी म्हटले.