
मुंबई | Mumbai
आयपीएल (IPL) १६ मध्ये आज रविवार (दि.७ मे) रोजी डबल हेडर सामने खेळविण्यात येणार असून त्यातील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर दुपारी लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (LSG VS GT) यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना सायंकाळी सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळविण्यात येणार आहे...
लखनऊचा नियमित कर्णधार लोकेश राहुल (Lokesh Rahul) दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर झाला असून त्याच्या अनुपस्थितीत पर्यायी खेळाडू म्हणून करुण नायरला संघात स्थान देण्यात आले आहे. तर लखनऊची धुरा कृणाल पांड्याकडे (Krunal Pandya) सोपविण्यात आली आहे.
आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ आणि गुजरातचा ११ वा सामना असून लखनऊच्या खात्यात १० सामन्यात ५ विजय आणि ४ पराभव व एक अनिकाली सामन्यासह ११ गुण आहेत. त्यामुळे आता बाद फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी लखनऊला ४ पैकी ३ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे.
दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून गुजरातच्या खात्यात १० सामन्यात ७ विजय आणि ३ पराभवांसह १४ गुण आहेत. त्यामुळे गुजरातला बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी २ सामन्यात विजय आवश्यक आहे. तर याआधी झालेल्या सामन्यात गुजरातने लखनऊचा पराभव केला होता.
तर आयपीएल १६ मध्ये आज रविवार (दि.७ मे) रोजी दुसरा सामना सायंकाळी सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH VS RR) यांच्यात होणार असून अव्वल ४ संघात स्थान मिळवण्यासाठी राजस्थान रॉयल्सला ४ पैकी ३ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने आणखी एक सामना गमावला तर त्यांचे बाद फेरीतील स्थान निश्चित करणे आव्हानात्मक असणार आहे.
त्याचबरोबर सनरायझर्स हैद्राबादच्या खात्यात ९ सामन्यात ३ विजय आणि ६ पराभवांसह ६ गुण असून आयपीएल गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे आता अव्वल ४ संघांमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी हैद्राबादला ५ सामन्यात मोठया फरकाने विजय संपादन करावा लागणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या खात्यात १० सामन्यात ५ विजय आणि ५ पराभवांसह १० गुण आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांपैकी कोणता संघ विजयी ठरतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक