गुन्हेगार मित्रांची संगत नको रे बाबा...

तरुणाईला ‘भाई’चे आकर्षण, व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीत वाढ
गुन्हेगार मित्रांची संगत नको रे बाबा...

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

येत्या 6 ऑगस्टला ‘मैत्री दिन’ आहे. यानिमित्ताने कुसुमाग्रजांची एक कविता आठवते तेज असावे सूर्यासारखे ,प्रखरता असावी चंद्रासारखी, शितलता असावी चांदण्यांसारखी आणि मैत्री असावी तुझ्यासारखी! किती अर्थपूर्ण कविता आहे ही! आज मात्र अल्पवयीन मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये मैत्रीची व्याख्या बदलत चालली आहे. मित्राच्या चुकीच्या गोष्टीलादेखील साथ देताना समाजातील चांगल्या गोष्टींचा आजच्या पिढीला विसर पडत आहे.

काळानुसार इंटरनेट व सोशल मीडियामुळे जग अगदी जवळ आले आहे. असे असताना त्याचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटे दिसून येतात. गेल्या काही काळात आलेल्या सिनेमांमुळे आजची तरुण पिढी मित्रांच्या काही चुकीच्या गोष्टींना साथ द्यायला लागली आहे. यामुळे कळत नकळत या पिढीची गुन्हेगारीकडे वाटचाल सुरु झाली आहे. काही चित्रपटात एका गुन्हेगार मित्रासाठी दुसरा चांगला मित्रदेखील गुन्हेगारीत प्रवेश करताना दाखवले आहे त्यानुसार त्याचे अनुकरण करून तरुण पिढीदेखील कृत्य करतांना दिसून येते.

अल्पवयीनांचा सहभाग

नाशिक शहरात हाणामार्‍या किंवा खुनांच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांसह तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मित्रांसाठी काहीपण असे म्हणत मग तो चुकीचे काम करत असेल तरी त्याचे समर्थन करून त्याला साथ द्यायची आणि हाणामार्‍या करून स्वतःचेदेखील भवितव्य धोक्यात टाकायचे या चुकीच्या दिशेने आजची पिढी वाटचाल करताना दिसून येत आहे. 15 ते 17 वयोगटातील अल्पवयीनांचा यात सहभाग दिसून येतो.

‘त्याला’ मिळते ‘भाई’ची उपमा

एखाद्या तरुणाने गुन्हेगारी कृत्य केल्यानंतर काही काळ मध्यवर्ती कारागृहात राहून आल्यानंतर काही तरुण मंडळी त्याला आपला आदर्श मानून त्याला ‘भाई’ची उपमा देतात. त्याच्या सांगण्यावरून गुन्हेगारी कृत्य करायला तयार होणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. तुरुंगातून सुटून आल्यावर जणू काही त्या भाईने काहीतरी पराक्रम गाजवला आहे अशा अविर्भावात मिरवणुका काढल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

तरुणाई व्यसनाधीनतेकडे

संगतीने माणूस घडतो वा बिघडतो, असे म्हटले जाते. त्यानुसार जशी संगत तसे गुण बघायला मिळतात. आजच्या पिढीतील काही तरुण वाईट संगतीमुळे व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत आहेत. नशेत आपण काय निर्णय घेतो याचे भान त्यांना राहत नाही आणि नकळत गुन्हेगारीकडे त्यांचे मार्गक्रमण सुरु होते. वाईट मित्रांच्या संगतीने दारू ते एम डी असा प्रवास कधी सुरु होतो हे कळेपर्यंत वेळ गेली असते त्यानंतर व्यसनासाठी पैसे नसल्याने तरुण चोरी घरफोडी करायला सुरवात केल्याच्या कित्येक घटना यापूर्वी घडल्या आहेत.

जनजागृतीची गरज

बरेच पालक आपली मुले लहान आहेत, ते असे गुन्हेगारी कृत्य करू शकत नाही, अशा भूमिकेत असतात. परंतु आपल्या मुलांना कुणाची संगत लागली आहे ती चांगली आहे कि वाईट याकडे दुर्लक्ष केल्याने मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते. मुलांमध्ये सतत चांगल्या गोष्टींचे व चांगल्या मित्रांच्या संगतीबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. आजची तरुण पिढी उद्याचे देशाचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com