शिवकृपेसाठी भक्तीचा मार्ग सोडू नका : पं. मिश्रा

शिवकृपेसाठी भक्तीचा मार्ग सोडू नका : पं. मिश्रा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

पृथ्वीतलावर आलेले संत तुकाराम, एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी समर्थ, संत मिराबाई, करमाबाई हे ईश्वरी अवतारच होते. मात्र या संतांना ओळखण्यास वेळ लागला ते ईश्वरी लिन झाल्यावर त्यांचे देवत्व व महती कळली. या संतांना देखील वाईट अपशब्द बोलणारे होते मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या भक्तीची कास कधी सोडली नाही. तसेच तुम्ही भक्ती व परमार्थ करण्यास प्रारंभ केल्यावर भगवान महादेव कोणत्या रूपात दर्शन देतील याचा भरवसा नसल्याने शिवकृपेसाठी भक्तीचा मार्ग सोडू नका, असा उपदेश प्रख्यात श्री.शिव महापुराण (Shri Shivmahapuran Katha )कथाकार पंडित प्रदिप मिश्रा (Pandit Pradip Mishra ) यांनी येथे बोलतांना दिला.

येथील कॉलेज मैदानावर सुरू असलेल्या पुण्यश्री शिव महापुराण कथेची आज सातव्या दिवशी भक्तीभावपुर्ण वातावरणात सांगता केली गेली. यावेळी भक्ती व परमार्थाच्या मार्गातून परमेश्वर प्राप्तीवर पंडित मिश्रा यांनी उपस्थित भाविकांचे निरूपन केले. शेवटचा दिवस असल्याने 5 लाखावर भाविकांनी कथा श्रवणासाठी कॉलेज मैदानासह परिसरातील रस्त्यांवर बसले होते.

मालेगावच्या पवित्र भुमीत श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन विश्व कल्याणासाठी केले गेले. कथा आयोजन करणारे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह समिती सदस्य तसेच या शहरातील सर्व समाजाचे महिला, पुरूष भाविकांनी दिलेले योगदान शिवकृपेस पात्र ठरणारे आहे. भाविकांची सेवा कशी करावी, आदर कसा ठेवावा हे मालेगावकरांनी दाखवून दिल्याने आपण थक्क झालो आहोत. लाखो भाविक उपस्थित असतांना देखील कुणीही कशापासून देखील वंचित राहिला नाही ही सेवाच शिवतत्व असल्याचे सांगत पंडित मिश्रा यांनी सेवा-भक्ती जागृत झाल्यास परमेश्वर प्राप्तीस वेळ लागत नसल्याचे यावेळी सांगितले.

आपल्यावर संकटे, दु:ख व कष्ट हे मागील जन्माचे पाप फेडण्यासाठी आलेले असतात. शरिरावर झालेली जखम बरी होण्यास वेळ लागतो. तसेच दु:ख दूर होण्यासाठी देखील थोडा अवधी द्यावा लागतो. तुमचे दु:ख, कष्ट कुणी महाराज अथवा जादू, टोणे दूर करू शकत नाही. शिवभक्तीव्दारे परमार्थाचे कार्य करत राहा भगवंत नामस्मरणाने हे दु:ख निश्चित दूर होत असते. यासाठी फक्त तुम्ही भगवान महादेवांना हृदयात ठेवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज असल्याचे सांगत पंडित मिश्रा पुढे म्हणाले, नववर्षाचे स्वागत हॉटेलात नाही तर शिवालयात महादेवावर एक तांब्या पाणी व एक बेलपत्र वाहून त्याची आराधना करत करा.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना निश्चित पुर्ण होतील. घरात मंदिर बनवू नका परंतू मंदिरात घर बनवले पाहिजे. घरात मंदिर आहे परंतू वर्तन अयोग्य आहे अशा ठिकाणी देव कसे वास्तव्य करतील यासाठी मन पवित्र व निर्मल राहिले पाहिजे. कुणाची निंदा व विश्वासघात करू नका यासारखे दुसरे पाप नाही. आपण सत्कर्मास लागल्यावरच विश्वाचे कल्याण होवू शकते याची जाणीव प्रत्येक मानवाने ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

परिवारात अपशब्द, दु:ख व निंदा मिळत असेल तेव्हा समजा तुम्ही महादेव आहात म्हणूनच तुमच्या पदरी हे विष आले आहे. समुद्र मंथनात अमृत देवांनी प्राशन केले तर विष महादेवाने आज ब्रम्हांडामध्ये महादेवांचाच जयजयकार होत आहे. याकडे लक्ष वेधत पंडित मिश्रा म्हणाले, सनातन धर्म, राष्ट्राच्या प्रगतीसाठी तुम्ही जागृत व्हा.

लहानातले लहान काम करा यासाठी लाजू नका, कुणाची निंदा व विश्वासघात न करता परमार्थाचे कार्य करत राहा, देवतांचे संकट दूर करणारे भगवान महादेव तुमचे संकट देखील निश्चित दूर करतील हा विश्वास बाळगा, असे आवाहन करीत त्यांनी बारा ज्योतीर्लिंगांची स्थापना व त्याची महती विषद केली. कथेच्या सांगतेनंतर पालकमंत्री दादा भुसे(Guardian Minister Dada Bhuse ), अनीता भुसे यांनी आरती करत पंडित मिश्रा यांचा समस्त भाविकांतर्फे सन्मान केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com