जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : सात संचालक बिनविरोध

माघारीचा दिवस मनधरणी, चिठ्ठीने गाजला
जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : सात संचालक बिनविरोध

नाशिक । विजय गिते Nashik

जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या संचालक पदासाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेर (दि.24) च्या दिवशी सात तालुका प्रतिनिधींचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर, मालेगाव ,कळवण, सटाणा, दिंडोरी, नांदगाव,चांदवड व इगतपुरी या तालुक्यांचा समावेश आहे.

येवला,निफाड,पेठ,सुरगाणा, सिन्नर, नाशिक व देवळा येथे काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होणार आहे. अशीच परिस्थिती राखीव प्रवर्गाच्या जागांसाठी राहणार आहे. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेले तालुका संचालक पुढीलप्रमाणे त्र्यंबकेश्वर- संपतराव सकाळे, मालेगाव - राजेंद्र भोसले, कळवण - रोहित पगार, सटाणा - शिवाजीराव रौदळ, दिंडोरी- प्रमोद मुळाणे, नांदगाव -प्रमोद भाबड व इगतपुरी- ज्ञानेश्वर लहांगे.

येवला, निफाड, पेठ, सुरगाणा, सिन्नर, नाशिक व देवळा येथे काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होणार आहे. अशीच परिस्थिती राखीव प्रवर्गाच्या जागांसाठी राहणार आहे.

चांदवडचीच चर्चा

चांदवड तालुका संचालक पदाची निवडणूक ही प्रत्यक्ष मतदानापूर्वी माघारीच्या दिवशी चांगलीच गाजली. या एका जागेसाठी बिनविरोध निवड व्हावी,यासाठी चिठ्ठी टाकण्यात आली. यामध्ये म्हसु कापसे यांची चिट्ठी सर्वानुमते निघाली. त्यानुसार कापसे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करून देत इतरांनी माघारी घेण्याचा निर्णय चिठ्ठी टाकण्यापूर्वी घेतला होता. मात्र, उमेदवार शरद आहेर यांनी घुमजाव करत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास नकार देत तेथून सगळ्यांच्याच हातावर तुरी देत धूम ठोकली.अखेर शिवाजी कासव यांनीही आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला नाही.त्यामुळे शरद आहेर व शिवाजी कासव यांच्यामध्ये पूर्वापार पारंपारिक लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.गत निवडणुकीच्या वेळीही कापसे यांच्या नावाची चिट्ठी निघाली होती.तेव्हाही त्यांना आहेर यांनीच दगा दिला होता.त्याचीच पुनरावृत्ती यावेळी झाली,अन कापसे यांना पुन्हा धोका दिला. बिनविरोध निवडीसाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल,माजी जि.प.सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, मविप्र संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदींनी प्रयत्न केले. मात्र,त्यास फळ आले नाही.

कोकाटे विरुद्ध कोकाटे

सिन्नर तालुका संचालकपदाची निवडणूक ही जिल्हाभर लक्षवेधी ठरेल,अशी चिन्हे आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे समर्थक दिनकर उगले हे पुन्हा रिंगणात उतरले असून आमदार कोकाटे यांचे लहान बंधू भारत कोकाटे यांनीही निवडणुकी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेत आमदार भावापुढेच आव्हान उभे केले आहे.यामुळे उगले आणि कोकाटे यांच्यात सरळ लढत होणार असली तरी या निवडणुकीकडे कोकाटे विरुद्ध कोकाटे अशा लढतीकडेच लक्ष राहणार आहे.

भुजबळ विरुद्ध दराडे

येवला तालुका संचालकपदाची निवडणूक आता जिल्हाभर लक्षवेधी ठरणार अशी चिन्हे आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थक सविता धनवटे आणि नरेंद्र दराडे व किशोर दराडे आमदार बंधू यांच्या समर्थक मंदा प्रवीण बोडके यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.येथून विद्यमान संचालक संभाजी पवार यांनी माघार घेतली असून येथे दोन महिलांमधील लढत लक्षवेधी ठरणार आहे.

निफाडमध्ये थोरे यांचा लागणार कस

निफाडची निवडणूक ही आता चांगलीच रंगतदार होणार असून येथे दुरंगी लढत होणार आहे.यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांचे पुतणे अमल थोरे व सुनील सोनवणे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. सुनील सोनवणे यांना निफाडचे आमदार दिलीप बनकर यांचा पाठिंबा असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहे.

पेठला बारा मतदार अन् चार उमेदवार

पेठ तालुका संचालक पदासाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून येथे केवळ 12 मतदार असताना तब्बल चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. मात्र,चार पैकी गंगाराम टोपले यांनी माघार घेतली असून आता मनोज धूम, भगवान पाडवी व सुरेश भोळे यांच्यामध्ये तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे. सुरगाणा तालुका संचालक पदासाठीही सरळ लढत होणार असून निवडणूक रिंगणात आनंदा चौधरी व राजेंद्र गावित आहेत.

हिरे यांनाही तगडे आव्हान

नाशिक तालुका संचालक पदासाठी विद्यमान संचालक योगेश हिरे यांनाही तगडे आव्हान राहूणार असून येथे चौरंगी लढत बघायला मिळणार आहे. हिरे यांच्याबरोबरच शर्मिला कुशारे,उत्तमराव बोराडे, मिलिंद रसाळ हेही निवडणूक रिंगणात आहे. फेडरेशनचे नेते केदा आहेर यांच्या देवळा तालुक्यामध्येही तिरंगी लढत होणार असून सतीश सोमवंशी, सुभाष गायकवाड व सुनील देवरे हे निवडणूक रिंगणात आहे.

एन.टी.गटात साले मेव्हण्यात लढाई

एन.टी.गटासाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी उमेदवारांची संख्या मोठी असून या जागेसाठी माघारीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.त्यामुळे येथे बहुरंगी लढत होणार आहे. या गटातून आप्पासाहेब दराडे,शशिकांत आव्हाड,सुदर्शन सांगळे,कविता अनिल आव्हाड ,राजाभाऊ खेमनर, अशोक कुमावत, प्रसाद राजपूत, आदींचे उमेदवारी अर्ज शिल्लक असून बहुरंगी लढत होणार आहे. याबाबतचे खरे चित्र शुक्रवारी स्पष्ट होईल.

राखीव जागांवर बहुरंगी लढती

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एका जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये प्रवीण जाधव,रवी भालेराव, शशिकांत उबाळे, अशोक रोकडे, किरण निरभवणे,अरुण शिंदे, उत्तम भालेराव, हेमंत झोले हे निवडणूक रिंगणात आहे.

महिलांसाठी राखीव दोन जागांकरिता चौरंगी लढत होणार असून अनिता भामरे, आशा चव्हाण, कविता शिंदे, दीप्ती अभिजीत पाटील यांच्यामधील लढत होणार आहे. या गटातून 11 महिलांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ओबीसींसाठी राखीव एका जागासाठी अर्जुन चुंबळे, संदीप थेटे, पवन अहिरराव, गणेश कदम, पंकज ठाकरे,सुनील आडके, मिलिंद रसाळ निवडणूक रिंगणात असून येथे बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com