Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याब्रह्मगिरीसह सह्याद्रीच्या जैवविविधतेलाच सुरूंग

ब्रह्मगिरीसह सह्याद्रीच्या जैवविविधतेलाच सुरूंग

नाशिक। खंडू जगताप

‘दृष्टी पडता ब्रह्मगिरी। त्यासी नाही यमपुरी॥’ असे ब्रह्मगिरीचे महत्त्व अनेक संत-महंतांनी विशद केले आहे. तेथील वनसंपदा, डोंगररांगा यांचे वर्णन संतांनी केलेच; परंतु सह्याद्री रांगांतील या डोंगराचे जैवविविधतेतील महत्त्व अलौकिक आहे. मात्र गौण खनिजासाठी ब्रह्मगिरीच्या पोटाला सुरूंग लावले आहेत.

- Advertisement -

एकूण सह्याद्रीच्या अस्तित्वावरच घाला घातला जात आहे. यासाठी परिघातील नैसर्गिक संपदेचा बळी घेतला जात आहे. ब्रह्मगिरी व अंजनेरी हे सह्याद्रीच्या डोंगर रांगामधील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे डोंगर आहेत. या दोन्ही डोंगरांवर अतिशय दुर्मिळ वनौषधी आहेत. तसेच अंजनेरी डोंगरावरील गिधाडे दीर्घकाळ वास्तव्यासाठी ब्रह्मगिरीची निवड करतात. पावसासाठीही ब्रह्मगिरीचे महत्त्व अनन्य आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो. सह्याद्रीच्या या डोंगररांगांमुळे पडणार्‍या पावसाचा पुढे मराठवाड्यापर्यंत फायदा होतो. डोंगर पोखरण्याच्या उद्योगामुळे ही सगळी पाळेमुळे उखडून, जैवविविधता धोक्यात येत आहे.

यापूर्वी सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये समावेश असलेल्या नाशिक परिसरात पांडवलेणी, संतोषा डोंगर, रामशेज, त्याच्या बाजूला असलेली चामरलेणी या डोंगरसंपदेला नख लावण्याचे उद्योग अनेकदा झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गालगतचा संतोषा डोंगर अर्ध्याहून अधिक पोखरला गेला आहे. आणखी काहीच वर्षांनी तेथे डोंगर होता हे मुलांना सांगितले तरी विश्वास बसणार नाही.

अवैध उत्खनन करणार्‍यांनी पैशांची वारेमाप उधळपट्टी केल्याने, तलाठ्यांपासून ते बड्या अधिकार्‍यांनी त्यांना साथ दिल्याचे यातून वास्तव समोर येत आहे. गौण खनिज तसेच डोंगरालगतच्या जमिनी लाटण्याचे भूमाफियांच्या साखळ्याच तयार झाल्या आहेत. अशा मंडळींविरोधात नाशिक, पुणे, मुंबईसह सर्वच शहरांत नागरिकांसह पर्यावरणवाद्यांनी एकत्र येत, वेळोवेळी टेकडी बचाव आंदोलनेही सुरू केली आहेत.

आता नाशिक जिल्ह्यात ‘सेव्ह ब्रह्मगिरी’ ही चळवळच त्या निमित्ताने उभी राहते आहे. यापूर्वी अंजनेरी डोंगरावरील जैवविविधतेसाठी घातक ठरू पाहणारा बहुचर्चित रस्ते प्रकल्प स्थानिकांच्या पुढाकारातून पर्यावरणप्रेमींनी हाणून पाडला. आता त्याच गतीने ब्रह्मगिरी वाचविण्यासाठी चळवळ उभी राहिली आहे. इतर जिल्ह्यांतील नागरिक व पर्यावरणप्रेमीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहिमेला समर्थन देत आहेत.

तर पुढील पिढी माफ करणार नाही : भिभास आमोणकर

सह्याद्रीच्या रांगेतील ब्रह्मगिरी व अंजनेरी या डोंगराचे जैवविविधतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक सेंटीमीटर जैवविविधता तयार होण्यासाठी किमान 30 वर्षे लागतात. परंतु माणसाच्या हव्यासापोटी अनेक डोंगर अगोदर झाडे तोडून बोडके केले आहेत. तर आता त्यांचे उत्खनन सुरू केले आहे.

अनेक डोंगरच्या डोंगर पोखरले गेले आहेत. यामुळे शेकडो वर्षांपासून तयार झालेली जैवविविधतेची ही साखळी उखडली जात आहे. याचा दुष्परिणाम तेथील अन्य वनस्पती, किटक, लहान पक्षी, मोठे पक्षी, लहान मोठे प्राणी यांच्यासह मानवालाही सहन करावे लागणार आहेत. आगामी काळात आपली भावी पिढी आपणास कधीच माफ करणार नाही.

यामुळे या पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. हे काम पर्यावरणवाद्यांचे आहे असा गैरसमज काढून टाकून प्रत्येकाने यासाठी पुढे येण्याची गरज असून लोकचळवळी निर्माण झाल्या तरच सह्याद्री वाचणार आहे, असे मत सह्याद्री बचावचे भिभास आमोणकर यांनी देशदूतशी बोलताना व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या