आपत्तीचे सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येणार्‍या मान्सूनकाळात ( Upcoming Rainy Season )संभाव्य आपत्तीचा धोका (Risk of potential disaster ) लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिक अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव,

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गांगुर्डे, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता एस. आर. वंजारी, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, राष्ट्रीय व राज्य आपत्ती निवारण दलाचे प्रतिनिधी यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मान्सून काळातील संभाव्य धोकादायक क्षेत्रांची पाहणी करून ते निश्चित करण्यात यावेत. त्यासाठी प्रत्येक गावनिहाय गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांचा गट तयार करून आपत्ती काळातील आवश्यक कामांची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात यावी. तसेच जलसंपदा विभागाने मान्सूनकाळात धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करताना सकाळी 8 वाजेनंतरच करावा.

याबाबत संबंधित भागातील जनतेला सतर्कतेच्या सूचना यावेळेत देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक धरणनिहाय माहिती देण्यासाठी एक उपअभियंता यांची नेमणूक करण्यात यावी. यासोबतच आपत्ती काळात सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागाचे आपत्ती निवारण कक्ष अद्ययावत करून त्याठिकाणी प्रशिक्षित व अनुभवी अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी. आपत्ती कालावधीत झालेल्या नुकसानीची नागरिकांना वेळेत मदत मिळण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्यासाठी अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

आपत्ती काळात नागरिकांना वेळेत मदत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांचे अद्ययावत संपर्क क्रमांक असलेली छोटी पुस्तिका जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातंर्गत तयार करण्यात यावी. तसेच लाईफ जॅकेट, रबर बोट, 100 मीटर लांबीचा दोर, मेगा फोन व गावातील नागरिकांना सूचित करण्यासाठी भोंगे, सर्च लाईट अशा बचाव साहित्याची व्यवस्था तालुकापातळीवर करण्यात यावी. याप्रमाणेच शहरातील संभाव्य आपत्तीचे निवारण करण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम, विद्युत, अग्निशमन दल या विभागांनी मान्सूनपूर्वीच नाले सफाई करून घ्यावी.

तसेच धोकादायक वाडे यांची देखभाल दुरूस्ती करावी, मोठी व जीर्ण झालेल्या वृक्षांची योग्य पद्धतीने छाटणी करण्यात यावी. आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार शासकीय रुग्णालयात पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळासोबतच, रुग्णवाहिका व आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी,अशा सूचना केल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *