
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिकरोड विभागाला सतावणारा दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न महासभेत निकाली काढण्यात आला असून, गंगापूर पाठोपाठ दारणा धरणातून 250 कोटींच्या थेट पाईपलाईन योजनेला महासभेने मंजुरी दिली.
या योजनेसाठीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (मजिप्रा) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. दारणा धरण थेट पाईपलाईन योजनेसाठी महापालिकेला केंद्राच्या अमृत 2 अभियानांतर्गत प्रकल्प खर्चाच्या एकूण 52.81 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात मिळणार आहे. उर्वरित रक्कम महापालिकेला स्वनिधीतून खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी महापालिकेला स्व-हिस्सा, तांत्रिक मान्यता शुल्क, सल्लागार शुल्कासह सुमारे 125 कोटींचा भार उचलावा लागणार आहे.
नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चेहेडी पंपीग स्टेशनच्या माध्यमातून दारणा नदीपात्रातून पाणी उचलून जलशुध्दीकरण केंद्रामार्फत नाशिकरोड परिसरात पुरवठा केला जातो.
या पंपीग स्टेशनच्या अलीकडेच दारणा-वालदेवी नदीचा संगम आहे. वालदेवी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्याने हे सांडपाणी दारणा पात्रात मिसळते.त्यामुळे चेहडी पंपीग स्टेशनमार्फत नाशिकरोड विभागात दुषित पाणीपुरवठा होत असल्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे.
त्यामुळे चेहडी येथील पंपीग स्टेशनवरून दारणा नदीपात्रातील पाणी उचलणे महापालिकेने बंद केले असून, नाशिकरोड विभागाला तूर्त गंगापूर धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे.
परिणामी दारणा धरणातील महापालिकेचे पाणी आरक्षण वाया जात आहे. नाशिकरोडकरीता दारणाऐवजी गंगापूर धरणातून अतिरीक्त पाणी उचलावे लागत असल्यामुळे महापालिकेला दुप्पट दराने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरावी लागत होती.यातून मार्ग काढण्यासाठी केंद्राच्या अमृत 2 अभियानांतर्गत दारणा धरणातून थेट जलवाहिनी टाकण्याची योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील 250 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेत गुरूवारी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.