दोन हजार लोकांच्या उपस्थितीत असा झाला विवाहसोहळा

अदिती व निखिल यांचा अनोखा विवाह
दोन हजार लोकांच्या उपस्थितीत असा झाला विवाहसोहळा

औरंगाबाद-

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या शासनाने पारंपरिक पद्धतीने होणार्‍या लग्न समारंभावर निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत निखिल व अदिती या जोडप्याने ऑनलाईन पद्धतीने आपले शुभमंगल उरकले आहे. हा अनोखा ऑनलाईन विवाह सोहळा नुकताच सर्व नातेवाईकांच्या ऑनलाईन उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे यावेळी वधूवरांची सगळी हौसमौजही पूर्ण करण्यात आली. अवलगावकर व मातेकर परिवाराने याद्वारे एक अनोखे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थाटात लग्न समारंभ करण्यावर निर्बंध आले. अशावेळी अनेकांनी आपले नियोजित सोहळे पुढे ढकलले आहेत. मात्र यातूनही मार्ग कढत या परिवाराने ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पाडल्याने त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. दोन्ही परिवारातील नातेवाईक व मित्र मैत्रिणी मोठया संख्येने या अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले होते. जागतिक महामारी असल्याने सध्या आपल्याला अनेक जवळच्या कार्यक्रमांना मुकावे लागत आहे परंतु प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा प्रबळ इच्छाशक्ती व प्रगत तंत्रज्ञानाचा उत्तम नियोजनाचा योग्य वापर केल्यास जगाच्या पाठीवर कुठेही असलेले आपले आप्तेष्ठ आपल्या आनंदाच्या क्षणी आपल्या सोबत जोडले जाऊ शकतात हे यातून सिद्ध झाले. अदिती व निखिल यांचा हा अनोखा ऑनलाईन विवाह सोहळा अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.

विशेष म्हणजे या सोहोळ्याचे थेट प्रक्षेपण युट्यूबद्वारेही करण्यात आले होते. विक्रांत देशमुख यांनी या सोहळ्याची रुपरेषा सर्व नातेवाईक व मित्र परिवाराला आधीच पाठविली होती. मंगलाष्टक, सप्तपदी अशा सर्व कार्यक्रमांची वेगळी लिंक व वेळेनुसार तयार करून वेळेचे उत्तम नियोजन केले. कमी वेळेत हा सोहळा उत्तमपद्धतीने झाला. काळानुसार आपल्या सोहळ्यामध्ये केलेले बदलाचे उपस्थित नातेवाईकांनी कौतुक केले. दोन्ही परिवाराचे मिळुन अंदाजे दोन हजाराहून अधिक लोकांनी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सहकुटुंब सहपरीवार आपल्या घरात पहिले.

देश-विदेशातून पाहुण्यांची उपस्थिती

कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहताना दोन्ही परिवारांचे नातेवाईक व मित्र-मैत्रिणी आपल्या घरातच पारंपरिक वेषभूषा व गोडा धोडाचे जेवण बनवून सहभागी झाले. मंगलाष्टक झाल्या नंतर लगेचच सर्व ऑनलाईन पाहुण्यांनी नव विवाहित दाम्पत्यास ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. औरंगाबाद, परभणी, पुणे, मुंबई, अकोला, नाशिक, अहमदाबाद, गुवाहाटी येथूनच नव्हे तर अमेरिका व जपान अशा विविध ठिकाणांहून पाहुण्यांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com