आगे आगे देखो होता है क्या ?

उत्तर महाराष्ट्रावर कायमच अन्याय, आता होवू देणार नाही ! - एकनाथराव खडसे
आगे आगे देखो होता है क्या ?

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

राज्याच्या राजकारणात उत्तर महाराष्ट्रावर कायमच अन्याय झाला. गेली 40 वर्ष आपण यासाठी सभागृहात भांडत आहोत, असे सांगत ज्या पक्षासाठी रक्ताचे पाणी केले त्यांनीच माझ्यावर अन्याय केला.

आता उत्तर महाराष्ट्रात पुन्हा नवी ताकद निर्माण करु, असा विश्वास नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथराव खडसे यांनी शिरपूर येथे केले.

नंदुरबार दौर्‍यावर जातांना आज श्री. खडसे यांनी शिरपूरात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. खडसे म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन खान्देशात कमळ फुलवले. मात्र तथ्यहीन कारणे पुढे करून मला संपविण्याचा कुटील डाव भाजपातील नेता करीत असेल तर अजून किती सहन करावे? यामुळेच मी भाजपाला राम राम ठोकला. उत्तर महाराष्ट्राच्या अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीची वाट धरली, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तर महाराष्ट्रला कायम दुय्यम स्थान देवून अन्याय करण्यात आला. कोकणात तीन, विदर्भात सहा तर मराठाड्यातील चार नेते मुख्यमंत्री झालेत. मात्र उत्तर महाराष्ट्रातील भाऊसाहेब हिरे, रोहिदास पाटील, मधुकरराव चौधरी, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहिले.

पण ऐनवेळेस निर्णय बदवला गेला. हा एकनाथराव खडसे मोठ्या मेहनतीने तिथपर्यंत पोहचला परंतू खोटेनाट्ये आरोप, चौकशा लावत आपलाही किती छळ झाला हे सार्‍यांना माहित आहे. जेव्हा उत्तर महाराष्ट्राला संधी मिळणार असे वाटले, तेव्हाच नाथाभाऊवर खोटे आरोप करून बाजूला केले. हे एक षडयंत्र होते. परंतु यापुढे अन्याय सहन करणार नाही, तर याच भाजपा विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार व प्रसार करून विकास करु, असे सांगत आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही कळेल की, नाथाभाऊ काय होते? असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

भाजपचे संकट मोचन म्हटले जाणारे जळगांव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे किती तरी लोक भाजपा सोडुन गेले, त्यामुळे काही फरक पडत नाही? असा मुद्दा पत्रकारांनी छेडला असता, यावर खडसे म्हणाले, भाजपचे नेते जी गर्विष्ठ भाषा वापरतात त्यामुळे कार्यकर्ते दुरावत आहेत. आगामी काळात कळेल की भाजपचे काय नुकसान झाले.

आठवडाभरात फडणवीसांचा भ्रष्टाचार उघड करणार : अनिल गोटे

शिरपूरच्या या कार्यक्रमात बोलतांना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. अनिल गोटे यांनी दोन खळबळजनक विधाने केलीत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा घोटाळा आठवडाभरात बाहेर काढू, असे म्हणाले. तर माजी मंत्री जयकुमार रावल यांचा नामोउल्लेख न करता दोन महिन्यात त्यांच्यावरही कारवाई होईल असे सुतोवाच त्यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com