माझ्या नादी लागाल तर, खाल्लेले काढावे लागेल

टॉवर गार्डनचे काय? पाच कोटीत कोणकोण वाटेकरी ? - अनिल गोटे
अनिल गोटे
अनिल गोटे

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

आपल्या राजकीय आयुष्यात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवितांना अनेक आंदोलने केली, सगळी यशस्वी झाली.

यात अनेक अधिकारी आणि संघटनांना त्यांनी खाल्लेले पैसे परत काढायला लावले. माझ्या नादी लागाल तर तुमची देखील हीच गत होईल.

उगाच पोकळ धमक्या देवू नका? असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे.

सध्या शहरातील विकासाच्या मुद्यावरुन श्री.गोटे आणि भाजप यांच्यात पत्रकबाजी जुंपली आहे. श्री.गोटे यांनी पुन्हा भाजपाचा आपल्या पत्रकातून खरपूस समाचार घेतला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, शहरातील टॉवर गार्डनचे नेमके लफडे काय? 5 कोटी रूपयांच्या विकास कामात कोण कोण न्हाउन निघाले? पाच कोटी रूपयाच्या विकास कामाचे 5 वेळा भूमीपूजन झाले जो आला त्याने मलिदा खाल्ला.पण आजतागायत काम मात्र पूर्ण होऊ शकले नाही. मात्र 30 टक्के मलिदा खाऊन मोकळे झाले.

टॉवर गार्डनच्या प्रारंभाला नाशिक येथील ज्या ऑर्किटेकने डिझाईन केले होते. त्यांने काम अर्धवट सोडण्याचे कारण काय? धुळेकर जनतेला कळू द्या की, तुम्ही किती टक्क्यांची मागणी केली होती? उगाच माझ्या भानगडीत पडू नका. अन्यथा गिळलेले परत करावे लागेल असा इशारा श्री.गोटे यांनी दिला आहे.

यापुर्वी कदमबांडेच्या नेतृत्वाखाली मनपात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतांना तुम्ही पाईपलाईनच्या निकृष्ट कामांविरूध्द ठेकेदार घुले यांच्या विरूध्द आंदोलन केले होते.

घुलेला जेल मध्ये पाठवणार, धुळेकर जनतेच्या संपत्तीची लुट करणार्‍याला धडा शिकविणार, अशा वल्गणा केल्यात मात्र मनपात भाजपाची सत्ता येताच त्याच घुलेला काम दिले? पहिले टेन्डर रद्द करून दुसरे जास्त किंमतीचे टेन्डर काढायला लावले, तेहि घुलेलाच दिले, त्यामागील रहस्य धुळ्याच्या मतदारांना कळालेच पाहीजे, असेही श्री.गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com