Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याश्रीराम नवमी उत्सवासाठी रामभक्त सज्ज

श्रीराम नवमी उत्सवासाठी रामभक्त सज्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्रीराम नवमीचा उत्सव ( Shri Ram Navami Festival )साजरा करण्यासाठी सर्व रामभक्त सज्ज झाले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नाशिकच्या श्री काळाराम मंदिर ( Shri Kalaram Mandir ) व गोरेराम ( Shri Gore Ram Mandir )मंदिरातील उत्सवाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूचा ( Lord Vishnu ) सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो.

- Advertisement -

यंदा राम नवमीचा शुभमुहूर्त 9 एप्रिल रोजी रात्री 8 वाजून 24 मिनिटांपासून चैत्र शुद्ध नवमी समाप्ती – 11 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांपर्यंत आहे. श्रीराम पूजनाचा मुहूर्त – 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 39 मिनिटांपर्यंत आहे. रामनवमीला नेहमीप्रमाणे सुचिर्भूत होऊन श्रीरामांची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करतात. श्रीराम पूजनाचा संकल्प करून पंचामृताचा अभिषेक केला जातो. नंतर मुख्य अभिषेक होतो.

पूजेनंतर रामचरितमानस, रामरक्षा आणि शक्य असल्यास रामायणाचे पारायण करतात. दुसर्‍या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता होते. मर्यादा पुरुषोत्तम, अयोध्येचा आदर्श राजा, सत्यवचनी, भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणार्‍या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी 12 वाजता झाला. अलौकिक, दिव्य पुरुष आणि रघुकुलदीपक असलेल्या श्रीरामांच्या नावाने ही तिथी राम नवमी म्हणून साजरी केली जाते.

श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श होते. देवाचा अवतार असले, तरी त्यांचे आयुष्य परीश्रमयुक्त असेच होते. मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले. राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही. रामनवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात. रामरक्षा पठणाने सर्व कष्टांचे निवारण होते, असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक गावात राम मंदिरात रामनवमीची उत्सव साजरा होतो.

नाशिकमध्ये रामनवमीनिमित्त काढण्यात येणारी रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. तो संस्कृतीचा व नाशिककरांच्या औत्सुक्याचा विषय असतो. श्रीमंत माधवराव पेशवे गंभीर आजारी असताना त्यांचे मामा असलेले नाशिकचे सरदार रास्ते यांनी नवस बोलून तो रथ काळाराम संस्थानकडे 1785 मध्ये अर्पण केला. त्यामुळे त्याला रास्त्यांचा रामरथ म्हणून देखील ओळखले जाते. तेव्हापासून चैत्र शुध्द नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर चैत्र शुद्ध एकादशीला रामरथ आणि गरुड रथाची मिरवणुकीची परंपरा कायम आहे.

225 वर्षे ही परंपरा नाशिकच्या संस्कृतीचे एक अंग बनली आहे. रामरथ ( Ramrath )ओढण्याची जबाबदारी रास्ते आखाडा तालीम संघाकडे, तर गरुडरथ ओढण्याची परंपरा अहिल्याराम व्यायामशाळेकडे असते. अन्य शेकडो नाशिककरही मोठ्या उत्साहाने हा रथ ओढत सहभागी होतात. दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदा निर्बंधमुक्त मोकळ्या वातावरणात हा उत्सव साजरा होत आहे.

मंदिरे सजली

पंचवटीतील गोरेराम मंदिर, रामकुंडावरील अहिल्यादेवी मंदिर, तपोवनातील श्रीराम पर्णकुटी, रविवार कारंजा परिसरातील तेली गल्लीतील राम मंदिर, मुठे गल्लीतील राम मंदिर, भोसला मिलिटरी कॉलेजच्या आवारातील राम मंदिर, नाशिकरोडला मुक्तिधाम, टाकळी मठ व परिसरातील बिर्ला मंदिर, तसेच वाल्मीकनगर येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे.

पाच दिवे लावण्याचे आवाहन

आज दि. 10 एप्रिलला रामनवमीनिमित्त सायंकाळी साडेसातला घरात किंवा घराबाहेर असाल त्या ठिकाणी 5 दिवे लावून विश्व प्रकाशित करण्याचे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीने केले आहे. या निमित्ताने सगळ्यांना कळावे की, प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करणारे लोक रात्रीला दिवसात बदलू शकतात, असे समितीने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या